राज्याची स्वयंपूर्तीच्या दिशेने वाटचाल; मुख्यमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी प्रत्येकांनी विविध योजनांच्या माध्यमातून पुढे येऊन आत्मनिर्भर बनावे. तसेच पंचायत आणि अन्य स्थानिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

डिचोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ स्वप्नाच्या पूर्ततेसाठी गोवा राज्य स्वयंपूर्ण बनणे आवश्‍यक असून, त्यादृष्टीने राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारच्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोचवून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकार भर देत आहे. विविध कामांतर्गत स्थानिक महिला वा युवक गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आग्रही आहे, अशी ग्वाही  (मंगळवारी) साळ-डिचोली येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी प्रत्येकांनी विविध योजनांच्या माध्यमातून पुढे येऊन आत्मनिर्भर बनावे. तसेच पंचायत आणि अन्य स्थानिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले. कंत्राटदारांकडून करण्यात येणारे एखादे काम योग्य आणि दर्जात्मक होईल. याची शाश्वती नसते. उलट स्थानिकांकडून करण्यात येणाऱ्या कामामागे निश्‍चितच आत्मियता दिसून येणार, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) तिळारी पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्यातील कालव्याच्या स्वच्छता कामाचा प्रारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. साळ-डिचोली येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो, डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांची उपस्थिती होती. यावेळी साळ पंचायतीचे सरपंच घन:श्‍याम राऊत, उपसरपंच वर्षा साळकर, प्रकाश राऊत आदी पंच तसेच लाटंबार्से, मुळगाव पंचायतीचे सरपंच आणि पंचसदस्य तसेच जलसंपदा खाते आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, उपस्थित होते. 

स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कृषी विकासाअंतर्गत बंधारे आदी अन्य प्रकल्पांची कामे यापुढे ‘मनरेगा’ वा अन्य योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘कोविड’ महामारी काळात १ हजार ८०९ जणांना रोजगार उपलब्ध करून देताना त्यांच्या बॅंक खात्यात ७३ लाख रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मंत्री लोबो यांनी यावेळी बोलताना दिली. ‘मनरेगा’ योजनेंतर्गत तिळारी कालव्याच्या स्वच्छता कामाला केंद्राकडून मंजुरी मिळाल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. सभापती राजेश पाटणेकर यांनी यावेळी बोलताना सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

केंद्राकडून १.४३ कोटी..!
डिचोली, बार्देश आणि पेडणेत तालुक्‍यात येणाऱ्या या १२० किलोमीटर लांबीच्या कालव्यातील गाळ उपसून त्याची साफसफाई करण्यात येणार आहे. जलसंपदा खात्याच्या सहकार्याने ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे हे काम करण्यात येणार आहे. या कामावर दीड कोटी खर्च करण्यात येणार आहे. यातील राज्य सरकार केवळ ७ लाख रुपयांचा भार पडणार आहे. तर १.४३ कोटी रुपये निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध झाला आहे. या कामानिमित्त ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत शंभरहून अधिकजणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

संबंधित बातम्या