'नारळ खवणे' ही एक कलाच आहे

नारळ (coconut) खवणे ही एक कला आहे आणि या कलेतून आपण आनंद घ्यायला शिकायला पाहिजे.
'नारळ खवणे' ही एक कलाच आहे
story on coconutDainik Gomantak

नारळ (coconut) खवणे ही एक कला आहे. ती सहजी साध्य होत नाही. साधकाने स्वतः प्रयत्न केल्याशिवाय साधत नाही. नारळ हा मुळात एक कुटुंबाचे रूपक आहे. बाहेरील कठीण आवरण म्हणजे कुटुंबातील (Family) पुरुष. पूर्ण कुटुंबाचे बाहेरील त्रासापासून रक्षण (Protection) करणारा. शिवाय त्याला शेंडी आहे म्हणजे त्याची मुंज बांधून झालेली आहेच. कोयत्याचा पहिला घाव हाच सोसतो. त्या आत असते ती कातळी कुटुंबातील स्त्री. तलम मुलायम नाजूक आणि शुध्द. आतील गोड पाणी (water) म्हणजे लहान मूल. ताजे आणि टवटवीत. करवंटी च्या आत कातळी आणि त्याच्या आत गोड पाणी, अगदी वाहते आणि मस्ती खोर. नारळ फोडताना कितीही पाणी वाचवायचा प्रयत्न करा थोडे सांडतेच. थोडे वात्रट थोडे निरागस.काही नारळ मात्र कमनशिबी यात पाणी नसतेच अगदी थेंबालाही.

story on coconut
Ganesh Festival: गणेश चतुर्थीतही जीवनशैलीनुसार बदल

नारळ खवणे हा एक सोहळा. अर्धी वाटी घेऊन विळी समोर बसायचे. जणू तुम्ही दुचाकीवर बसला आहात आणि विळीची धार तुमचे स्कूटरचे हँडल आणि नारळ वाटीने तुम्ही अखी विळी कंट्रोल करता आहात. आता नारळ खवणायला सुरुवात होते. नारळ वाटी थोडी तिरपी धरून खवणायला घ्यायची, सुरुवातीला ‘खर खर’ म्हणून फक्त आवाज येतो काही खोबरे येतंच नाही. उथळ नारळाला खवखवाट फार. ही नारळ वाटी सुरुवातीला फक्त डेमो आवाज देतो. मग थोडा थोडा रस येतो. अगदी दुधासारखा अगदी रसरशीत आणि मग हळूहळू ताजे खोबरे येऊ लागते. अगदी बर्फवृष्टी होताना बारीक बारीक बर्फ पडेल तसे खोबरे पडू लागते.

story on coconut
100 वर्ष जुना मखर पाहिलाय का?

एक लेयर येतो मागोमाग दुसरा मग तिसरा अगदी बर्फाचा पर्वत उभा रहातो. श्री शिवाचा कैलास पर्वत तो हाच अगदी. नारळ वाटीचे खोबरे संपत येते. ‘खरखर’चा आवाज बदलू लागतो अगदी खर्जातला आवाज लागतो आणि शेवटी तपकिरी रंगाचे आवरण पडू लागते. तेव्हा आवरते घ्यायचे असते. बाजूला उरलेली बारीक कातळी विळीची धार वापरून काढायची आणि हळूच तोंडा ओठाला स्पर्श न करता जिभेवर सोडायची ( नेवैद्य प्रसाद मात्र करताना हे टाळयचं) विळीच्या धारेवर लागलेले खोबरे बोटाने हळूच काढून समोर ताटात उतरलेल्या खोबऱ्यात सोडायचे. ही ‘नारळ खवणे’ हे जर गायन असेल तर गायकीतली भैरवी. आता विळी दुमडून घ्यायची आणि आता नारळ खव्या विळीवरून उठायला मोकळा होतो. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नारळ खवणे ही एक कला आहे आणि या कलेतून आनंद घ्यायला शिकायला पाहिजे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com