मंदिर, इतिहास पर्यटन आणि गोवा

गोव्यात असे अनेक गांव आहेत ज्यामध्ये हेरिटेज टुरीझम चालू शकते. गोव्यात तीन प्रकारची पुरातन घरे आढळतात. एक म्हणजे हिंदू शैलीचे घर तर दुसरे ख्रिश्चन शैलीचे घर.
मंदिर, इतिहास पर्यटन आणि गोवा

Temples History Tourism and Goa

Dainik Gomantk

कोणताही इतिहास (History) लिहायचा असेल तर त्याला निश्चित पुराव्यांची गरज लागते. या पुराव्यावरून त्या भागाची व त्या काळाची गणना करता येते. मूर्ती, ताम्रपट, शिलालेख, दस्तऐवज अशी आमच्या इतिहासाची साधने आहेत. गोव्यात (Goa) प्राचीन काळी खूप वैभवशाली मंदिरे होती, हे येथे वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या उत्खननाच्या वेळी सिध्द झालेले आहे. पुरातत्त्व खात्याला याठिकाणी सापडलेले अवशेष प्राचीन नाणी, शिलालेख व ताम्रपट येथील मंदिरांचे (Temple) गतवैभव सांगतात.

आज इतिहास आणि पर्यटन या संकल्पनेला जगभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. याला ऐतिहासिक पर्यटन किंवा हेरिटज टुरिझम असे म्हटले जाते. जगातील अनेक राष्ट्रे अशा पर्यटनाला (Tourism) उत्तेजन देतात. याला अनेक कारणे आहेत. यातील काही प्रमुख कारणे म्हणजे अशा संकल्पनेखाली येणाऱ्या पर्यटकांचा दर्जा वेगळा असतो. असे पर्यटक (Tourist) जास्तकरून संशोधक किंंवा विद्यार्थी असतात. यापैकी काही जिज्ञासू असतात. अशा पर्यटकाना हाताळण्यासाठी वेगळ्या प्रकारची रचना सरकारी यंत्रणाना करावी लागतेआणि अशा पर्यटनाला पाठबळ देण्याचा मूळ मुद्दा म्हणजे प्रगती. देशातील अनेक एेतिहासिक स्थळे दुर्गम भागात किंवा शहरापासून दूर असतात. यामुळे तेथे पर्यटक नेण्यासाठी त्या भागातील रस्ते, वीज इ. साधनसुविधांची सुधारणा करावी लागते जी अशा पर्यटनातून सहज येणाऱ्या निधीमुळे होते. मग अशा पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याकडे असलेल्या इतिहासाचे आकर्षण ठरणारे अवशेष व स्थळे आहेत हे बघायला हवे. तसेच आपल्याकडे असलेल्या इतिहासाचे संकलन करून तो जागतिक स्तरावर प्रकाशित करण्याचे यत्न केले पाहिजेत.

<div class="paragraphs"><p>Temples History Tourism and Goa</p></div>
स्वातंत्र्य ते गोवा मुक्ती; एक ऐतिहासिक धांदोळा

गोव्याचा इतिहास 4थ्या शतकापासून सुरू होतो. राजा देवराजभोज यांची चांदर येथे राजधानी होती, राज्य होते. पण या शतकातील आज गोव्यात कुठलेही मंदिर किंवा अवशेष मिळत नाहीत. 4थ्या शतकातील राजा देवराजभोज हे सासष्टी तालुक्यातील चांदर या गांवाहून राज्य करत होते. यामुळे चांदर गोव्याची पहिली राजधानी होती, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 4थ्या शतकातील राजा देवराजभोजाच्या ताम्रपटात या गांवाला चंद्रऊर म्हणत होते, असा उल्लेख सापडतो.

त्याच्या नंतरच्या काळात सापडलेले ताम्रपट चंद्रऊरला चंद्रपूर असे संबोधतात. कदंब राजांनीसुध्दा 11व्या शतकापर्यंत येथूनच राज्य केले. 11व्या शतकात कदंब राजा विरवर्मदेव यांनी गोव्याची राजधानी गोपकपटट्ण (म्हणजे आजचे गोवा वेल्हा) येथे हलविली. 13व्या ते 14व्या शतकात कदंब साम्रराजाने चंद्रपूरला पुन्हा एकदा राजधानीचा दर्जा दिला. 14व्या शतकात होन्नावरच्या नवाबाने चंद्रपूरवर हल्ला करुन ती उदध्वस्त केली. 1320 मध्ये मोहम्मद बीन तुघलकच्या सैन्याने चंद्रपूरवर हल्ला केला. पुढे चंद्रपूर पोर्तुगीजाच्या आक्रमणाला व बाटाबाटीला बळी पडले.

चंद्रपूरचा अपभ्रंश पुढे चांद्रा असा झाला व पुढे पोर्तुगीज काळात ते चांदोर झाले. पण त्याचे पुढे देखील या गांवचे नांव पोर्तुगीजानी ‘शांदोर' असे उच्चारायला सुरवात केली. 1930 मध्ये जेजुईट मिशनरी रॅ. फादर हॅन्री हॅरश गोव्यात आले. त्यांना गोव्याच्या प्राचीन इतिहासाबद्दल खूप कुतूहल होते, असे त्यांनी केलेल्या कामावरुन व त्यांच्या लिखाणावरून समजते. त्यांनी चांदर ‘कॉट' येथील देवळांतळय नांवाच्या जागेत उत्खननाचे काम हाती घेतले. त्या जागेत असलेला मातीचा ढिगारा व त्या जागेच्या नावांच्या कुतूहलाने त्यांनी तेथे उत्खनन सुरू केले असावे. देवळांतळय या नावावरून तेथे आसपास पूर्वी मंदिराची तळी होती असा तर्क काढता येतो. पण आज तेथे तळीच्या कुठल्याही खुणा किंवा अवशेष सापडत नाही.

उत्खननाच्या वेळी त्यांना तेथे भला मोठा पाषाणी नंदी सापडला. नंदीचे डोके उदध्वस्त केलेले होते. भारतीय पुरातत्त्व खात्याने सन 2000 साली येथे परत उत्खनन केले. त्यात त्यांना मंदिराचे कोरीव काम केलेले अधिष्ठानसुध्दा सापडले. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या 'चांदोर 2000 नामक अहवालानुसार या प्रकारची अधिष्ठाने सातव्या शतकातल्या मंदिरात सापडतात.

<div class="paragraphs"><p>Temples History Tourism and Goa</p></div>
गोव्याला फुलपाखरांची नैसर्गिक देणगी

गोव्यात असे अनेक गांव आहेत ज्यामध्ये हेरिटेज टुरीझम चालू शकते. उत्तर गोव्यात पोर्तुगीजकालीन किल्ले आहेत तर फोंडा तालुक्याला सीटी ओफ टेंम्पल्स म्हणून घोषीत केल्यास त्या भागाकडे अजून पर्यटक येऊ शकतात. अशा पर्यटनासाठी मंदिरे, चर्च आणि ऐतिहासीक स्थळे नव्हे तर पुरातन घरे, वास्तुसुध्दा प्रोत्साहन देतात. गोव्यात तीन प्रकारची पुरातन घरे आढळतात. एक म्हणजे हिंदू शैलीचे घर तर दुसरे ख्रिश्चन शैलीचे घर. अजून एक प्रकार गोव्यात आढळतो तो हिंदू शैलीचे ख्रिश्चन घर. अशा घरांच्या मध्यभागी राजांगण असते तसेच लग्नात होणाऱ्या नृत्यासाठी एक खास बॉलरूम असतो. अशी पुरातन घरे सांभाळणे अनेक मालकांना जड झालेली आहेत. मग अशा घरांत पर्यटकांना रहाण्यासाठी गेस्ट हाऊस बनवून ह्या घरांपासून स्थानिकांना रोजगारसुध्दा मिळवता येतो.

अशी काही घरे चांदरला आहेत तसेच पणजी येथे फोंताईन्यश वाडा अशा काही घरांनी भरलेला आहे. या वाड्यातून पर्यटकांना चालत नेऊन त्या शहराचे व जाग्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगता येते. याला हेरिटेज वॉक्स असे म्हणतात. तसेच अशा पर्यटनाला सरकिट्स म्हणजे एका स्थळापासून शेवटच्या स्थळापर्यंत कसे नेता येतील याचे पूर्व नियोजन करणे गरजेचे असते.

- डॉ. रोहित फळगांवकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com