गोधड्यांची जागा घेतली चादरींनी

प्रत्येकाने कधी ना कधी, एकदा तरी आपल्या आईच्या हस्तकौशल्यातून तयार झालेल्या अप्रुपाच्या गोधडीत, अंगाचे मुटकुळे करून स्वतःला गुडूप करून घेतले असेलच.
गोधड्या
गोधड्याDainik Gomantak

चादरी, ब्लॅंकेट वगैरे ह्या अलीकडच्या गोष्टी. आपली जुनी कापडे सुई-दोऱ्याने विणून आई जे बनवायची, त्यात झोप उबदार होऊन जायची. प्रत्येकाने कधी ना कधी, एकदा तरी आपल्या आईच्या हस्तकौशल्यातून तयार झालेल्या अप्रुपाच्या गोधडीत, अंगाचे मुटकुळे करून स्वतःला गुडूप करून घेतले असेलच. कालांतराने गोधड्यांची जागा हळूहळू सोलापुरी चादरींनी घेतली. अर्थात आईच्या बोटातला शीण त्यामुळे नक्कीच कमी झाला असेल पण गोधडीमधला उबदार मऊ काळोख त्यानंतर अंगावरून हरवलाच. मात्र गोधडीत ओवलेल्या ‘आपलेपणा’च्या धाग्याची वीण अजूनही मनातून उसवली जात नाही.

आई आता गोधडी शिवत नाही. पण जेव्हा आपण गोधड्या विकत घ्यायला प्रदर्शनातल्या एखाद्या स्टॉलवर जातो आणि तिथल्या सुबक गोधडीवरून हात फिरवतो तेव्हा, केवळ त्या गोधड्यांचा मऊपणा आपण चाचपून पाहत नसतो तर हाताला होणाऱ्या त्या गोधडीच्या स्पर्शात, आपण आपल्या आठवणीही चाचपत असतो. आपल्या मनात त्या वेळीही एखादं ‘निजेला आलेले बाळ’ असतेच.

‘जायली क्रिएशन्स्’ असं आताच्या काळाला शोभणार नाव घेऊन गोधड्यांच्या चार पिढ्यांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या लीना कातकर या गोधड्यांच्या व्यवसायात आहेत. आपल्या आजी-आईकडून मिळवलेल्या कलात्मक गोधड्यांचा वारसा त्यांनी आपल्या मुलीकडेही हस्तांतरित केला आहे. त्यांची मुलगी जायली नाईक ही आता मार्केटिंगचे आधुनिक तंत्र स्वीकारून (ऑनलाईन सेल वगैरे) त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करते आहे. लीना कातकर यांचे माहेरचे मूळ गाव मयडे, हळदोणा इथले. त्यांचे वडील आपल्या कामानिमित्त मुंबईला असल्याकारणाने लीनाचे शिक्षण तिथेच झाले. कलेची आवड असल्यामुळे ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’मधून त्यांनी फाईन आर्टचे (Fine Art) धडेही घेतले.

लीना यांच्या आजी गोधड्या शिवण्यात वाकबगार होत्या. त्या कुटुंबातल्या साऱ्या सदस्यांसाठी- मुले, नातू वगैरेंसाठी आनंदाने गोधड्या शिवायच्या. लीना सांगतात, कपाट गोधड्यानी अगदी भरलेले असायचे. गोधड्या विणायचा वारसा नंतर लीनाच्या आईकडे आला. आजीच्या गोधडी विणकामावर त्यांनी एक पुस्तकही प्रकाशित केले.गोव्यात आल्यानंतर लीना यांनी शिवणक्षेत्रातच काम करायला सुरुवात केली. मात्र त्यांच्यामधला आर्टिस्ट (Artist) अस्वस्थच होता. पण मग त्यानंतर त्यांनी विचार केला की ‘गोधड्या’ देखील कलाच आहे तर मग आजीच्या संगतीत लहानपणी निरखलेली ही कलाच, आपण व्यवसाय म्हणून का स्वीकारू नये? त्यानंतर त्यांनी ह्या गोधड्यांतच आपली कला गुंतवली.

लीना सांगतात, या व्यवसायात कलात्मकता तर झालीच पण विश्वासार्हतासुद्धा खूप जपावी लागते. विश्वासार्हतेमुळेच त्यांना आज कामाची कमतरता भासत नाही. त्यांना ऑर्डर (Order) सतत मिळत असतात. विश्वासार्हतेबद्दल त्यांनी एक उदाहरण सांगितले, एकदा पुण्यातल्या एका कुटुंबाला लंडनमद्धे (London) असलेल्या आपल्या नातेवाईकांना गोधड्या पाठवायच्या होत्या. त्यांनी आपली ऑर्डर गोव्यात ‘जायली क्रिएशन्स’कडे नोंदवली. गोधड्या हाताने विणायच्या होत्या. त्यांच्या डिझाइनला पुण्यातून (Pune) मान्यता मिळाली आणि त्यानंतर गोधड्या विणून, जायली क्रिएशन्सकडून त्या अमेरिकेला (America) परस्पर पाठवल्या गेल्या. तिथे त्या सार्‍यांनाच फार आवडल्या. या साऱ्याच व्यवहारात, ऑर्डर नोंदवणाऱ्या पुण्याच्या गिर्हाईकांशी त्यांची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. पण ‘विश्वास’या माध्यमातूनच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडला होता.

गोधड्याव्यतिरिक्त लहान मुलांची झबली, माणे (लहान मुलांच्या गोधड्या) उशी, लोड वगैरेदेखील ‘जायली क्रिएशन्स’ बनवते. त्यातसुद्धा सौंदर्यदृष्टी राखणे आवश्यक असते. त्यांनी बनवलेल्या या वस्तूंनाही सुंदरता आहे.‘जायली क्रिएशन्स’ हे नाव लीना यांच्या मुलीच्या नावावरूनच घेतले गेले आहे. जायलीने ‘मास कम्युनिकेशन’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे मार्केटिंगचे (Marketing) आधुनिक तंत्र स्वीकारणे लीना यांना शक्य झाले. आजीकडून शिकून घेतलेला ‘गोधडी’चा वारसा आता तिच्या मुलीकडे येऊन पोहोचला आहे. लीना म्हणतात, गोव्याच्या (Goa) लोकांना कलेची जाणकारी आणि कदर आहेत. त्यामुळेही आपल्या या व्यवसायावर तिला पूर्ण भरोसा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com