गोव्यात पुन्हा होणार जल क्रीडा आणि जल पर्यटनासाठी गर्दी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

हॉटेल व्यवसाय जूनमध्येच सुरू झाले असले तरी पर्यटन मात्र बंद होते. पर्यटन संचालक मेनिनो डिसोझा यांनी शुक्रवारी जलपर्यटन व जलक्रीडा सुरू करण्यासाठीचे विशेष निकष जारी केले. गोव्याच्या प्रवास आणि पर्यटन संघटनेने जलपर्यटन व जलक्रीडा सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याकडे दाखल केलेल्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पणजी- शुक्रवारी राज्य सरकारने नदी जलपर्यटन व जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी दिली. यावेळी पर्यटन खात्याने हा व्यवसाय सुरू झाल्यावर घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षा व स्वच्छतेबाबतचे निकष व नियमावली जाहीर केली. ज्यामध्ये व्यावसायिकांकडून अपेक्षित असलेल्या कार्यप्रणाली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.

हॉटेल व्यवसाय जूनमध्येच सुरू झाले असले तरी पर्यटन मात्र बंद होते. पर्यटन संचालक मेनिनो डिसोझा यांनी शुक्रवारी जलपर्यटन व जलक्रीडा सुरू करण्यासाठीचे विशेष निकष जारी केले. गोव्याच्या प्रवास आणि पर्यटन संघटनेने जलपर्यटन व जलक्रीडा सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याकडे दाखल केलेल्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आला. गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 

गोवा प्रवास आणि पर्यटन संघटनेने कोरोनाचा प्रभाव कायम असल्यामुळे नदी जलपर्यटन व जलक्रीडा सुरू केल्यावर राज्यात कोरोनाचा उद्रेक होऊ नये. यासाठी विशिष्ट कार्यप्रणालीदेखील पर्यटन खात्याकडे सादर केली आहे. आता अधिकृत मार्गदर्शक तत्वांनुसार जहाजावर आलेल्या सर्व पर्यटकांचे तसेच कामगारांचे शरीर तापमान मोजणे बंधनकारक आहे. फक्त कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना जहाजावर प्रवेश देण्यात येईल. जहाजाच्या सर्व कार्यक्षेत्रांमध्ये हॅंड सॅनिटायझरची सुविधा करण्यात येईल तसेच गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना सुनियोजित पद्धतीने आत व बाहेर सोडणे गरजेचे आहे. 

नव्या नियमांनुसार जहाजाची प्रवासी क्षमता ही जहाजाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के इतकीच असेल. जहाजावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल, अशी आसनव्यवस्था करणे अनिवार्य आहे. दरवर्षी मॉन्सूननंतर जलक्रीडेला सुरूवात होते. आॉक्टोबरनंतर पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. परंतु, यावर्षी कोरोना व अतिवृष्टीमुळे यास विलंब होण्याची चिंता वर्तवली जात आहे. 
दरम्यान, समुद्रकिनारी व्यवसाय असलेले व्यावसायिक या निर्णयाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट बघत आहेत.

संबंधित बातम्या