गोव्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या अमेरिकन कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

“राज्यात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूकीद्वारे गोव्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या अमेरिकन कंपन्यांना राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल”, असं प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या उद्घाटन प्रसंगी केलं.

 

पणजी : “राज्यात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूकीद्वारे गोव्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या अमेरिकन कंपन्यांना राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल”, असं प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या उद्घाटन प्रसंगी केलं.

मुख्यमंत्री म्हणाले, “अमेरिकन कंपन्यांनी थेट विदेशी गुंतवणूकीद्वारे गोव्यात गुंतवणूक करावी अशी सरकारची इच्छा असेल. राज्य सरकार अशा गुंतवणूकींना सर्वतोपरी सहकार्य करेल. राज्याचे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ
प्राथमिक आधारावर गुंतवणूकीची प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता एक खिडकी प्रणालीची सोय उपलब्ध करुन देईल. राज्याचा औद्योगिक उर्जा दर कमी असून, उद्योग स्थापन करण्यासाठी सरकारद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे.”

“राज्याचे अमेरिकेशी दीर्घ संबंध आहे. अनेक गोवन विद्यार्थी अमेरिकेत शिकत आहेत. व्हायब्रंट गोवा शिखर परिषदेचा एक भाग म्हणून गोवन नागरिकांनी मागील वर्षी अमेरिकेच्या चार वेगवेगळ्या शहरांमध्ये रोड शो केले होते.”, असेदेखील त्यांनी नमूद केले.

गोव्यातील उद्योगांविषयी बोलताना सावंत म्हणाले, “फार्मास्युटिकल उद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे, ज्याची वार्षिक उलाढाल मागील वर्षी अठराशे कोटी इतकी होती ज्याची निर्यात अमेरिकेसह जगातील अनेक देशांत होते.“

“सरकारचा भर राज्यात शैक्षणिक केंद्रे, ज्ञान आधारित उद्योग, करमणूक केंद्रे, फिल्म सिटी उभारण्यावर आहे, जेणेकरून जगातील दर्जेदार शैक्षणिक संस्था राज्यात स्थापन होऊ शकतील. माहीती व तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणाच्या नव्या धोरणानुसार, उच्च स्तरिय नवीन-युगातील टेक स्टार्टअप्सना आकर्षित करण्यासाठी आणि राज्यात स्टार्ट-अपच्या वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत असल्यामुळे आंम्हाला मोठ्या गुंतवणूकीची अपेक्षा आहे,” असे सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या