गणपती बाप्पाला काय काय आवडते?

गणपतीला काय काय आवडते, याची यादी करायची म्हटले तर ती खूप मोठी होईल. दूर्वा, तुळस, बेल-पत्रीदेखील गणपतीच्या आवडत्या गोष्टींपैकीच. त्याची कारणे...
गणपती बाप्पाला काय काय आवडते?
गणपती बाप्पाला काय काय आवडते? Dainik Gomantak

चातुर्मासात नाना व्रते, खूप नेम असतात. तसा श्रावण महिनाही सण, व्रतवैकल्यांचाच. पूजा-अर्जा, तर नित्यनियमाने... कोणी लक्ष वाती लावतात, तर कोणी फुले, दूर्वा वाहतात. दूर्वा वेचण्याची घाई. नाजूक काम ते, तरारून येणारे दूर्वांचे गवत पाहत राहावे असे.. किती भाले, टोकदार पण हळवे! एकवीस दूर्वांच्या एकवीस जुड्या गणपतीला पहिल्या दिवशी वाहण्याचा प्रघात आहे. कारण श्रीगणेशाला दूर्वा अतिशय प्रिय आहेत.

तसे तर दूर्वा, बेल, तुळशीची पाने-पत्री हे सगळे देवदेवतांना प्रिय आहे. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दूर्वा, शंकराला बेल... त्याशिवाय साग्रसंगीत पूजा होत नाही असे मानले जाते. मनात विचार येतो, की, दूर्वा, बेल, पत्री यासारख्या पानांना इतके महत्त्व का दिले जाते? जाणवले, की धार्मिक विधींशी, व्रतांशी व पूजा-अर्चेशी या पानांची सांगड घालून पूर्वजांनी योजकता, तार्किकता, उपलब्धता याचा मेळ घातला आहे. शिवाय आपला देश कृषिप्रधान, भारतीय जीवनाचा तो पायाधर्म आहे. त्यामुळेच पूजेसाठी या पानांना प्राधान्य देण्याची दूरदृष्टी पूर्वजांकडे असावी.

गणपती बाप्पाला काय काय आवडते?
Ganesh Chaturthi: बाप्पांना मोदक का अवडतात?

दूर्वा, बेल व तुळशीची पाने वा पत्री यांना महत्त्व देण्याचे कारण म्हणजे, जे वाहायचे ते देवासाठी असते. 108 पाने वाहा. तुळशीची पाने 108, बेलाची पाने 108, दूर्वा 21 असा नेम सांगितला जातो. चातुर्मासात तो पाळला जातो. देवाला फुलांपेक्षा पानेच का जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशीपत्र, दूर्वा, बेल याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे तुळशीपत्र, दूर्वा वगैरे मिळावयास त्रास पडत नाही. वाटेल तेथे उगवू शकतात. थोडे पाणी घातले, की अगदी फ्लॅट संस्कृतीतील बाल्कनीत, टेरेसवरही येऊ शकतात. म्हणजे ही पाने उपलब्ध व्हायला फार धावाधाव करावी लागत नाही. लक्ष संख्येत वाहणे असाही नेम असतो.

फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलायची. पण पाने मात्र नेहमीच आहेत. झाड जिवंत आहे, तोपर्यंत पाने आहेतच. पानांना दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी, संतांनी देवाला पानच प्रिय आहे, असे सांगून ठेवले. गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयासही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण-नारळ पाहून गरीब भक्तांना मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे, असे संत-महंत, ऋषी-मुनींनी सांगितले आहे. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको आणि गरिबाला गरिबीची लाज वाटावयास नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने कितीही वा केवढीही मोठी दक्षिणा दिली, तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. उद्देश हा, की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. गर्व व अहंकार या भावना येऊ नयेत. आपण एक पान दिले, असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला दूर्वा, हरतालिकांना, मंगळागौरीलाही पत्री आधी लागते. ही साधी, सुंदर पाने आधी हवीत. लोकगीते व ओव्या पत्री-पानांचे महत्त्व सांगणाऱ्या आहेत-

गणपती बाप्पाला काय काय आवडते?
Ganesh Festival: गणेश चतुर्थीतही जीवनशैलीनुसार बदल

"चल सखी वेचायला, गणरायाला दूर्वा।

लक्ष वाहीन नेम माझा, नसेना पूजेला मारवा।।''

शंकर पती मिळावा म्हणून पार्वतीने हरतालिका हे व्रत केले, ती सखीसह वर्तमान अरण्यात गेली, उग्र तप केले. शिवाची स्थापना करून मनोभावे पूजा केली. तिला शंकर प्रसन्न झाला व तिचा शंकराशी विवाह झाला. हरतालिका पूजेतही बेलाची पाने, तुळशीपत्री यास महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः लग्नाच्या आधी मुलींनी हे व्रत करायचे असे म्हणतात. जोडीदार तोही मनपसंत मिळावा म्हणून हे व्रत केले जाते. ही पूजाही पान-पत्रीनेच केली जाते.

दूर्वा तर आता वनौषधी म्हणून मान्यता पावल्या आहेत. दूर्वांचा रस सकाळी प्राशन करण्यातून होणारे फायदे सर्वांनाच पटले आहेत. तेव्हा आरोग्यशास्त्रानुसार दूर्वा पाने उपयुक्त असून आरोग्याविषयीची जागरूकता वाढल्याने त्याचा वापरही वाढत आहे. तुळशीची पाने तर जवळपास घरोघरी तुळस असल्याने सहजी मिळू शकतात. सर्दी, पडसे, कफ वगैरेसाठीच्या काढा औषधीत तुळशी पाने लागतातच. घसा साफ होण्यासाठी तुळशीची पाने गुणकारी ठरतात. हल्ली तर पर्यावरण साधण्यासाठी तुळशी लावल्या जातात. तुळशीचे लॉन, वाफे, कॉर्नर करण्याचेही प्रमाण वाढले आहे. ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासाठी तुळशीची झाडे उपयुक्त आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com