अश्लील चित्रफित पाहताना मेंदूत नेमकं काय घडतं?

अश्लील चित्रफित पाहताना मेंदूत नेमकं काय घडतं?
watching

यात येताना मुलांमध्ये अचानक अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होऊ लागतात. हार्मोन्समधील बदलांमुळे मुलाचं रुपांतर पुरुषात आणि मुलीचं रुपांतर स्त्रीमध्ये होऊ लागतं. एकाच वेळी उत्सुकता, मानसिक गोंधळ, स्वप्नाळूपणा, तीव्र कामेच्छेचा उगम अशा सगळ्या गोष्टी असतात. मग ही मुलं  इंटरनेटवरील बऱ्यावाईट साईट्सवरची माहिती आणि पोर्न फिल्म्स ह्यांच्याद्वारे जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू त्यातील काही मुलामुलींचा पोर्नफिल्म्स हा मुख्य सोर्स बनू लागतो.(What exactly happens in the brain while watching a blue film)

इथेच धोका सुरु होतो. त्यांना आता व्यवस्थित शास्त्रीय माहिती नको असते, तर  उत्तेजना निर्माण करणारी आभासी दुनिया हवी असते. यातून मेंदूतील नैसर्गिक कामभावनेची निकोप वाढ खुंटायला लागते. त्यातील प्रेम भावनांचं महत्त्व, जोडीदाराविषयीचा आदर ह्या गोष्टींचं महत्त्व वाटेनासं होतं. त्या फिल्म्समधील विकृत, रानटी पद्धतीनं चित्रित केलेले उपभोग यातच आनंद वाटायला लागतो. अतिरेकी हस्तमैथुन, उत्तेजक पेयं, व्यसनं आणि पुन्हापुन्हा त्या फिल्म्स पहाण्याची इच्छा, असे सगळे होते.

मेंदूत नेमकं काय घडतं ? साधारण बारा ते वीस ह्या  वयात मेंदूतील न्युरॉनल स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाचे बदल घडत असतात. कोट्यवधी नवीन ‘सिन्याप्टिक कनेक्शन्स’ तयार होत असतात. ह्याच वयादरम्यान अवतीभवतीच्या वातावरणाचा, संगतीचा, चांगल्या-वाईट मूल्यांचा पगडा आपल्यावर बसत जातो. व्यक्तिमत्वाची इमारत चांगल्या पायावर उभी करण्याचं म्हणूनच हेच वय असतं. जेव्हा ह्या वयातील मुलं सतत पोर्नफिल्म्स बघतात, तेव्हा त्यांची चित्तवृत्ती, भावना, दृष्टिकोन ह्यावर विपरीत परिणाम घडत जातो. स्त्री- पुरुष संबंध म्हणजे फक्त आणि फक्त शारीरिक उपभोग ही कल्पना तयार व्हायला लागते. पोर्नफिल्म्समधले कृत्रिम अवयव, अतिरंजित हालचाली, वासनांचा कल्लोळ हेच सत्य वाटायला लागतं आणि ते लवकरात लवकर मिळावं ही सुप्त इच्छा निर्माण व्हायला लागते. 

पोर्नफिल्म्सच्या व्यसनाचे तोटे 
1 संधी मिळाल्यास प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तीव्र इच्छा. तसं घडल्यास, प्रत्यक्ष अनुभव घेताना, मनामध्ये फिल्ममधील अवास्तव चित्रण आणि वास्तवातला अनुभव ह्याची तुलना होत राहते. पुढे वैवाहिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतो.

2 स्वत:च्या शरीराविषयी विनाकारण शरम वाटू लागतो. त्यानं आत्मप्रतिमा दुबळी होत जाते.

पोर्नफिल्म्सचं व्यसन इतर व्यसनांना निमंत्रण देतं. नशा वाढवण्यासाठी किंवा तयार झालेला न्यूनगंड विसरण्यासाठी दारू, ड्रग्स इत्यादींचा आधार घेतला जाऊ शकतो.

4 विवाहाच्या पूर्वीच लैंगिक अनुभव घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. तसे वर्तन घडू शकते. अपराधगंड निर्माण होऊ शकतो.

5 अभ्यास, करिअर ह्यातील एकाग्रता नाहीशी होते.

6 स्त्री विषयी आदरभाव ठेवणे ह्या अतिशय आवश्यक अशा मूल्याचा ऱ्हास होऊ शकतो.

7 मेंदूतील स्मृति केंद्रांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

पालकांनी घ्यावयाच्या काळज्या 

1 सध्याच्या युगात इंटरनेटमुळे पोर्नफिल्म बघणं सहज शक्य आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ती पहात असलेल्या साईट्स चुकीच्या नाहीत ह्याची मधून मधून खात्री करून घ्यायला हवी. जर चुकून तसं काही आढळल्यास त्याची स्पष्ट कल्पना त्यांना द्यावी.

2 पाल्यांशी प्रेमाने बोलावे. त्यांना गुन्हेगार मानू नये. नैसर्गिक प्रवृत्तीतून हे घडलंय हे लक्षात ठेवावे.

3 शाळेत लैंगिक शिक्षणाचा तास झाला असो वा नसो त्याला प्रेमाने सर्व गोष्टी तसंच चुकीचं वागण्यातले धोके समजावून सांगावे. आवश्यक असल्यास तज्ञांची मदत घ्यावी.

4 समजावून सांगताना लैंगिक व्यवहारांविषयी अप्रीती निर्माण होईल असं काहीही सांगू नये. कुठलीही भीती घालू नये.

5 योग्य वयातील स्त्री पुरुष संबंध, त्यातील प्रेमभावनेचे महत्त्व, त्यातला आनंद समजावून द्यावा.

6 कामभावना मनात येणं नैसर्गिक आहे पण त्यावर विवेकाचा अंकुश का महत्वाचा आहे हे समजवावे.

7 पालकांचे स्वत:चे वर्तन, सवयी चांगल्या रहातील ह्याची खात्री करून घ्यावी. कामभावना ही एक अतिशय सुंदर नैसर्गिक आदिम भावना आहे. मानवामधे ती प्रेमभावनेशी, स्त्री सन्मानाशी, जबाबदारीच्या जाणिवेशी, विवेकानं जोडली जायला हवी. कळ्यांचं फुलांमध्ये रुपांतर होताना ही जाणीव रुजवायला हवी.

- डॉ. विद्याधर बापट

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com