दाढदुखीवरचा एक उपाय म्हणजे गाढवाचा मुका घेणे!

दाढदुखी आणि गाढव यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. मात्र, मध्ययुगीन काळातील जर्मनीत हा उपाय मोठ्या प्रमाणांत केला जायचा. थोडक्यात, दाढ आणि गाढव यांच्यात घनिष्ट संबंध होता!
What is connection between Toothache And donkeys
What is connection between Toothache And donkeys Dainik Gomantak

मला सांगा, दाढदुखी आणि गाढव यांचा अर्थाअर्थी काही संबंध आहे काय हो? तुम्ही नकारार्थी मान जोरजोरानं हलवून विचाराल,हे तुम्हाला म्हणजे मला - कुठल्या गाढवानं सांगितलं? तुम्ही पुढं असंही म्हणाल की, त्या दोघांचा अजिबातच संबंध नाही, कारण दाढदुखी ही हैराण करणारी एक व्यथा आहे तर' गाढव' हा एक चतुष्पाद प्राणी आहे. त्यांचा एकमेकांशी संबंध असेलच कसा? तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. कारण माझंही मत तेच आहे. पण तरीदेखील हाती आलेली माहिती वेगळंच सांगते. शिवाय ती माहिती सांगोवांगी स्वरुपाची नसून सरकारी दस्तऐवजात नमूद केलेली आहे. म्हणजे विश्वासार्हच की!

What is connection between Toothache And donkeys
फाती बिस्किट: प्रत्येकाची टेस्ट वेगळी

तसं पाहू जाता आपण सारेच या जगात तोंडाचं बोळकं घेऊनच जन्माला येतो. नंतरच्या कालावधीत तोंडात दात दिसू लागतात. दातांच्या एकूण संख्येच्या बाबतीत मात्र थोडा गोंधळ आहे, म्हणजे काहींच्या तोंडात बत्तीसच्य बत्तीसही दात असतात तर काहींच्या बाबतीत हीच दातांची संख्या अठ्ठावीस वा त्याहून कमीही असते. दात म्हणजे दंत, दाढ, सुळा, अक्कलदाढ, कवळी, बत्तिशी, दाताड... वगैर वगैरे. दातांचे प्रमुख उपयोग दोन. दातांमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. (काही वेळा दात चेहऱ्याचं सौंदर्य विघडवतात देखील) दातांनी चावता येतं, दातंमुळेच व्यवस्थित बोलताही येतं. विविध प्रकारच्या पदार्थांचा समाचार दात आणि दाढेद्वारेच घेतला जातो. समोरचे दात म्हणजे केवळ दाखवायचे दात असतात. खरंखुरं चर्वितचर्वण दाढांमुळेच होत. खायचे दात म्हणजे दाढा असं म्हटलं तरी चालेल. दातांचे सांगण्यासारखे काही प्रकार म्हणजे त्यातले काही दुधाचे दात असतात. ते आपसूकच पडतात आणि त्यांच्याजागी नवे दात येतात. दातांची निगा राखावी लागते अन्यथा ते आपल्या जागा सोडतात आणि तोंडाचं चक्क बोळकंलं करूनही सोडतात. पण वाढत्या वयात तोंडाचं बोळकं झालं म्हणून घाबरून जाण्यासारखं नसतं. दंतवैद्य नावाचा प्राणी कृत्रिम दातांची कवळी बसवून देतो. पण त्यांची सर मूळ दातांना येऊ शकत नाही, हेही तितकंच खरंय.... दात वेंगाडून दाखवता येतात, मुष्ठीयुद्धासारख्या खेळात दातांवर मूठ बसली तर ते पडू शकतात. तसं होऊ नये यासाठी प्रत्यक्ष खेळाच्या वेळी रबराचे दात मूळ दातांवर चढवले जातात. भांडणाच्या प्रसंगी ऐकवण्यात येणारी धमकी म्हणजे 'दात पाडून हातात देईन!' दात आणि पैशाचाही संबंध असावा कारण खिशात दमडा नसतो तेव्हा 'दातावर मारायाला सुद्धा पैसा नाही' असं आपण सहज म्हणून जातो...

दाढ म्हणजे दातांच्या कवळीतले म्हणा वा दंतपंक्तीतले शेवटचे मोठे दात. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर अक्कलदाढ उगवते. शहाणपणह वा अक्कल नेहमीच उशिरा येत असल्यामुळे उशीरा येणाऱ्या दाढेला अक्कलदाढ म्हंटलं जात असावं. अन्यथा अक्कल आणि दाढ यांचा परस्पराशी संबंध नसतो. दाढ या शब्दाशी साधार्य दर्शविणारा दुसरा एक शब्द म्हणजे दाढी. दाढ आणि दाढी यांच्यात एकाच वेलांटीचा तेवढा फरक पण दोघांचंही काम आणि जागाही वेगळी, दाढ तोंडात असते, जी सहसा दुसन्याला दर्शन घडवत नाही; या उलट दाढी गालावर उगवते आणि ती न छाटता उगवू दिली तर बऱ्यापैकी अस्तित्व दर्शविते. अन्नपचनाचं महत्वाचं काम दाढ करते तर चेहऱ्यावर एकाच वेळी रुबाब आणि भकासपण दर्शवण्याचं काम दाढीचं असतं. आपल्या गोव्यात दाढ आणि दाढी यांना वेगळं मानण्याऐवजी त्यासंबंधी, सांगताना बराच गोंधळ उडताना दिसते. म्हणजे "माझ्या बायकोची दाढी खूप दुखत होती त्यावर उपाय म्हणून दंतवैद्यानं ती उपटून काढली," असं आपल्यातले काही प्रसंगानुरूप सहज बोलून जाताच.

What is connection between Toothache And donkeys
Soy Affect Sexual Health: पुरुषांची सेक्सुअल हेल्थ खराब करु शकते 'सोया'?

दात वा दाढ यांचं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला दिवसभरात सहसा जाणवत नसलं तरी एकदा का त्यात छोटामोठा बिघाड होऊन दुखायला सुरवात होते तेव्हा हवालदिल होण्याव्यतिरिक्त आपण सुरवातीला तरी काहीही करू शकत नाही, दातांपेक्षा दाढेचं दुखणं अधिक परिणामकारक असतं. आपल्या तोंडातली एक दाढ नादुरुस्त झालेली आहे हे क्षणाक्षणाला जाणवून देणारी व्याधी म्हणजे दाढदुखी. एकदा का ती दुखायला लागली की, आपत्याला काहीही सुचेनासे होते. दैनंदिन जीवनातला अर्धाअधिक आनंद कमी होतो. अहो, साधा विनोदही आपल्याला हसवू शकत नाही. दुखणारा दात असा काही ठुसठुसू लागतो की, तो जणू तो हेच सांगू पाहतो की, काहीतरी उपचार करायला घे ! तसे दाढदुखीवर उपचार एक ना दोन, कितीतरी सांगता येतील. सुरवातीच्या घरगुती उपचारात मिठाची गुळणी कर, लवंग दाढेखाली धरायाला घे... किंवा लवंगाचे तेल लावून पहा इ. उपचार सुचवले जातात आणि ते आपण लगेच करायलाही घेतो. पण असल्या साध्या उपचारांनी दाढदुखी थांबली तर ती दाढदुखी हो कसली? दाढदुखीचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ती सहजासहजी बरी न होणेच. सगळ्याच तोंडी उपायानी हात टेकल्यावर मग आपली पावले दंतवैद्याच्या दिशेनंच पडू लागतात, पूर्वीचे आणि आताचे दंतवैद्य यांच्या उपचारातला एक जाणवणारा फरक म्हणजे पूर्वीचे दंतवैद्य दुखरी दाढ उपटून काढण्यावर भर द्यायचे तर आताचे दाढेवर उपचार करून तिच्या अस्तित्वाला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेतात. दाढदुखी बरी झाली वा थांबली की, जगण्यात उगाचच मौज वाटू लागते! दाढदुखीवरचा दंतवैद्याचा संबंध नसलेला एक उपाय म्हणजे म्हणे गाढवाचा मुका घेणे! अहो, मध्ययुगीन काळातील जर्मनीत हा उपाय मोठ्या प्रमाणांत केला जायचा. थोडक्यात, दाढ आणि गाढव यांच्यात घनिष्ट संबंध होता म्हणतात, ते खोटं नाही !!

-विजय कापडी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com