टाळेबंदीत लोक रमले ‘किचन गार्डन’मध्ये...

Dainik Gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

अनेकांनी जोपासला छंद, अंगणात, गॅलरीत केली भाजीपाला लागवड

पणजी,

कोणत्याही गोष्टीची नवनिर्मिती माणसाला सुखाचा अनुभव देत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र असणाऱ्या लॉकडाऊनचा फायदा अनेकजण त्यांचे छंद जोपासण्यासाठी करताना दिसून येत आहेत. यातील एक महत्वाचा छंद लोकांची आवड म्हणून पुढे येत आहे, तो म्हणजे किचन गार्डन किंवा बागकाम. लॉकडाऊनमुळे लोकांना पुरेसा वेळ मिळत असल्याने त्यांनी घराच्या अंगणात, गॅलरीतील कुंड्यांमध्ये भाजीपाला उगविण्याचा किंवा बागकाम करण्याचा उत्तम पर्याय शोधला आहे.
या छंदाला सोशल मीडिया अतिशय उत्कृष्टपणे खतपाणी घालत आहे. सध्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर किचन गार्डनचे फोटो आणि येथे केल्या जाणाऱ्या प्रयोगाबाबत टाकले जात आहे. गच्चीवरील मातीविरहीत शेती, किचन गार्डन, माझी बाग यासारखे अनेक ग्रुप समाज माध्यमांवर आहेत. जेथे हे लोक एकमेकांच्या बागेसाठी अनुभवांचा वापर करीत सल्ला देत आहेत.
राज्यातील महिला आणि पुरुष वर्गही या उपक्रमात आघाडीवर आहे. अनेक बालचमूही या उपक्रमात त्यांची पसंती दर्शवित आहे.
या किचन गार्डनमध्ये कढीपत्ता, गवारी, मेथी, पालक, लाल भाजी यासारख्या पालेभाज्या फुललेल्या पहायला मिळत आहेत. तर ज्यांच्याकडे भरपूर जागा आहे त्यांनी भेंडी, वालाच्या शेंगा, दोडक्याचा वेल, वांगी यासारख्या भाजा लावल्या आहेत.
अनेकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या फुलबागांना अधिक वेळ देता आला आणि त्यांची काळजी घेता आल्याचा अनुभवही सांगितला.
टाळेबंदीत बागकामासाठी अधिक वेळ देणे झाले शक्य
माझ्याकडे एक बाग आहे, जिच्यासाठी या कालावधीत मला अधिक वेळ देता आला. माझ्याकडे पूर्वी आणलेले खत होते. त्यामुळे झाडांना या कालावधीत खत कमी पडले नाही. कोरोनाच्या बातम्या वाचून मन उदास झाले की हीच झाडे आधार द्यायची. झाडांच्याच सहवासात दुपारचे जेवण आणि सायंकाळचा चहा घेणे होते. झाडांमुळे माझी उदासी दूर राहण्यास मदत झाल्याचे संगीता नाईक म्हणाल्या. 
------------------
चौकट करणे
बागकामामुळे मिळाले समाधान
मी गेली तीस वर्षे बागकाम आणि किचन गार्डनचा उपक्रम आवड म्हणून करते आहे. लोक आवडीने सेलिब्रिटी शेफ म्हणून बोलवतात, पण त्यामुळे मी बरीच व्यस्त असते. लॉकडाऊनच्या या काळात मला गार्डनकडे पाहण्यासाठी खूप वेळ मिळाला. ज्यामुळे एक वेगळे समाधान लाभले आणि कोरोनाच्या बातम्यांमपळे झालेले उदासी मन सकारात्मक होण्यास मदत झाली. माझ्या बागेत सेंद्रिय केळी, अंजीर, लिंबू, पपई यासारखी फळे असल्याची माहिती सरिता चव्हाण यांनी दिली.

संबंधित बातम्या