विघ्नहर्त्याच्या स्वागताची कोल्हापुरी परंपरा

Reuters
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

गणेश उत्सवासाठी लोकांकडून वर्गणीच मागितली जात नाही, उत्सवाच्या काळात आरतीची वेळ एका मिनिटानेही मागे-पुढे केली जात नाही किंवा आरतीसाठी प्रमुख पाहुणा यायचा आहे, म्हणून त्यांची वाट पाहत कोणीही थांबत नाही, विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी तर लांबच; पण टाळ मृदंग व एकसुरात टाळ्यांशिवाय दुसरं काहीही असत नाही... अशा तऱ्हेने गणेशोत्सव सोहळा असतो आणि आजही कोल्हापुरात काही मंडळांकडून तो तशाच पद्धतीने उत्साहात साजरा होतो, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. कारण आज गणेश उत्सव म्हणजे दणदणाट, लखलखाट आणि ऐश्‍वर्यी थाटाचा चमचमाट झाला आहे. जरूर या लखलखाटाला मोठी प्रसिद्धी मिळते; पण एखाद्या मंद पणतीने वादळातही आपली ज्योत फडफडत, अडखळत का होईना तेवत ठेवावी तशा पद्धतीने या मंडळांनी गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि परंपरा जपली आहे. किंबहुना मोठी वर्गणी, मोठी मूर्ती आणि मोठा गणेशोत्सव यापेक्षा परंपरा जपणाऱ्या मंडळांचा गणेशोत्सव कौतुकाचा ठरू लागला आहे. 

गणेश उत्सव म्हणजे धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचा आनंदी व जल्लोषी सोहळा दहा दिवसांचा असला तरी त्या आधी छोट्या छोट्या निमित्ताने सोहळ्याची चाहूल जाणवू लागते व कधी एकदा गणेश प्रतिष्ठापना होईल, या क्षणाचे काउंटडाउन सुरू होते. हा एकच असा सोहळा की त्याला जात, पात, धर्म, वयोगट याची मर्यादा नसते. कोल्हापूरचा गणेश उत्सव असाच परंपरेचा आणि सन्मानाचा. थोडं मागे जाऊन आढावा घेतला तर या सोहळ्याची खूप चांगली परंपरा. अर्थात आजसारखा लखलखाट त्या काळी नव्हता; पण हा सोहळा सर्व शहरवासीयांना आपल्यात आनंदाने सामावून घेणारा होता. 
सोहळा धार्मिक असला तरी यानिमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा कोल्हापुरात खूप जपली गेली. संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीत तर सारा गणेश उत्सव चळवळीचाच एक भाग बनून गेला.

मंगळवार पेठ ही शहरातली राजकीय व सामाजिकदृष्ट्या अतिशय जागरूक पेठ. आज आपण महापालिकेतील भ्रष्टाचाराची खूप चर्चा करतो; पण १९६०मध्ये नगरपालिकेतही अशीच परिस्थिती होती. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता व नगरपालिकेचा कर्मचारी दिनकर शिंदे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात नेटाने लढत होता. बढती देताना वशिलेबाजी होत असल्याचा त्याचा आरोप होता. एक दिवस त्याने या संतापाच्या भरात नगरपालिकेच्या इमारतीवरून आता माळकर तिकटी ज्या बाजूला आहे त्या बाजूला उडी मारून आत्महत्या केली. शहरात खूप गदारोळ माजला. हा दिनकर शिंदे मंगळवार पेठेत राहाणारा. त्या वर्षी गणेशोत्सवात सुबराव गवळी तालमीने (प्रॅक्‍टिस क्‍लब) त्या आत्महत्येवर आधारित देखावा उभा केला. या देखाव्याला इतकी दाद मिळाली की गणेशोत्सवानंतरही पंधरा दिवस हा देखावा चालू ठेवावा लागला. 

शहरातल्या खराब रस्त्यावरून रिक्षाचालकांनी आंदोलन केले. महापौर निवडणुकीच्या वेळीच महापालिका इमारतीला रिक्षा लावून घेराओ घातला. आंदोलन राज्यभर गाजले; पण शिवाजी पुतळा रिक्षा मंडळाच्या गणेश उत्सवात पुन्हा याच देखाव्याने कोल्हापूरकरांना खेचून घेतले. 

आज पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची चर्चा होत आहे; पण ३५ वर्षांपूर्वी जुन बुधवार पेठ तालीम मंडळाने कागदाच्या लगद्याची २१ फूट उंच गणेशमूर्ती आदिनाथ भणगे या कलाकाराने उभी केली होती. 

याच पेठेत आज शिपुगडे तालीम मंडळ, डांगे गल्ली तरुण मंडळ, सोल्जर ग्रुप असे देखावे सादर करते, की सारे कोल्हापूर या पेठेतील छोट्या गल्लीबोळात देखावे पाहण्यासाठी गर्दी करते. लोकांकडून वर्गणी गोळा न करताही गणेशोत्सव उत्साहात साजरा करता येतो, याची प्रचिती येथे मिळते. 

आज जुन्या राजवाड्यातील दौलतखान्यात (पोलिस ठाण्यातील एक खोली) गणेशमूर्तीची पारंपरिक प्रतिष्ठापना होते. हा दौलतखाना म्हणजे संस्थान काळातील खजिना व नाणे पाडण्याची टांकसाळ. या दौलतखान्यात परंपरेनुसार चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. परंपरेनुसार कै. हरिभाऊ माजगावकर यांच्या घरातच मूर्ती तयार केली गेली. हा दौलतखाना गणेश उत्सवातच खुला असतो. 

असाच मानाचा महालक्ष्मी भक्‍त मंडळाचा हा गणपती पूर्वी मंदिरात देवीचे दागिने जेथे ठेवतात तेथे बसवला जायचा; पण १८९० च्या सुमारास शंकरमामा काळे, जाधव सेवेकरी, मोरब्या दीक्षित, हरिभाऊ सेवेकरी, खांडेकर हवालदार यांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिले व पुढे विश्‍वनाथ बावडेकर, शंकरराव मेवेकरी, वसंतराव वाघ, नारायण किणीकर आदी मंडळींनी त्याला महालक्ष्मी भक्‍त मंडळाचे स्वरूप दिले. आज विसर्जन मिरवणुकीत मी पुढे की तु पुढे वरून वादाचे स्वरूप येते; पण या गणेशमूर्तीला मिरवणुकीत मार्गात येण्यासाठी सर्वांची एकमुखी संमती असते. या मिरवणुकीत रथ आजही हाताने ओढला जातो. घंटानाद व पेटलेली दिवटी मिरवणुकीत अखेरपर्यंत असते. 

विसर्जन मिरवणूक पूर्वी रात्री साडेदहा-अकराला संपत असे. आता रात्री दहानंतर मिरवणुकीला खरा रंग चढतो. मिरवणुकीत शेवटचा गणपती तटाकडील तालमीचा, हे ठरून गेले होते; पण तीस वर्षांपूर्वी त्याला ईर्षेचे स्वरूप आले. संध्यामठ तालीम मंडळाने आपला गणपती शेवटी राहणार, अशी भूमिका घेतली. वाद वाढला. एक दिवस एक रात्र दोन्ही तालमीचे गणपती एका ठिकाणी उभे राहिले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. शेवटी एक गणपती रंकाळा तलावात, एक पंचगंगा नदीत एकाच वेळी विसर्जित करण्याचा मार्ग निघाला व हा वाद मिटवला गेला. 

काळाच्या अशा बदलत्या ओघात कोल्हापूरचा गणेशोत्सव बदलत गेला. शाहूपुरी राधाकृष्ण तरुण मंडळ व राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाने मंदिर, राजवाडे, ऐतिहासिक वास्तूच्या भव्य प्रतिकृती उभ्या करून सोहळ्याला वेगळीच उंची दिली. राजारामपुरीत तर प्रत्येक गल्लीत म्युझिक लाईटचा धमाका सुरू झाल्यानंतर तर राजारामपुरी हीच गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू ठरला. 

आता गणेशोत्सवात उंच मूर्तीवर भर आहे. त्याहीपेक्षा विसर्जन मिरवणूक हा सोहळ्याचा मुख्य भाग ठरला आहे. मिरवणूक २७ ते २८ तास अखंड चालू राहाते आहे. डॉल्बीच्या भिंतीच्या भिंती उभ्या रहात आहेत. कारवाईची भीती मोडली आहे, तरीही प्रबोधन चालू आहे. 

नवसाला पावणारा गणपती?
नवसाला पावणारा गणपती ही नवी संकल्पना गणेशोत्सवात आली आहे. उघड फलक लावून तशी जाहिरात केली जात आहे. एक प्रकारे मंडळाचे उत्पन्न वाढवण्याचा हा बेकायदेशीर मार्ग काही मंडळांनी स्वीकारला आहे. 

गणेशमूर्तीबाबत उत्कंठा
पद्माळ्यात (जयप्रभा समोर) पद्मावती तरुण मंडळाने आजपर्यंत प्रत्येक वर्षी पुराणातील प्राचीन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून आपली वेगळी ओळख तयार केली आहे. आता शनिवार पेठेतील अष्टविनायक मित्र मंडळाने ही परंपरा चालू ठेवली आहे. या मंडळाची गणेशमूर्ती कशी असेल ही अखेरपर्यंत उत्कंठा असते.

संबंधित बातम्या