जगद्विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

जगद्विख्यात फुटबॉलपटू तसेच ‘हॅंड ऑफ गॉड’मुळे चर्चेत राहिलेले दिएगो मॅराडोना (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवारी रात्री निधन झाले. 

ब्युनोस आर्यस: जगद्विख्यात फुटबॉलपटू तसेच ‘हॅंड ऑफ गॉड’मुळे चर्चेत राहिलेले दिएगो मॅराडोना (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवारी रात्री निधन झाले. 

पेले यांच्यासह शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेले मॅराडोना यांनी १९८६मध्ये अर्जेंटिनास विश्वकरंडक जिंकून दिला होता. त्यानंतर चार वर्षांनी अर्जेंटिना अंतिम सामन्यात तत्कालीन पश्‍चिम जर्मनीविरुद्ध पराजित झाले. १९९४च्या स्पर्धेतही मॅराडोना यांनी अर्जेंटिनाचे नेतृत्व केले. त्यावेळी उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्यांना स्पर्धा सोडून जावे लागले. 

मॅराडोना यांनी अर्जेंटिनाचा विश्वकरंडक विजेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. २००८मध्ये अर्जेंटिनाचे मार्गदर्शकपद त्यांच्याकडे सोपवले, पण अर्जेंटिनास विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराजित व्हावे लागले. 

वाढदिवसानंतर रुग्णालयात
नुकताच साठावा वाढदिवस साजरा केल्यानंतर थकवा वाटू लागल्यामुळे मॅराडोना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांचे हृदयविकारामुळे निधन झाले.

शतकातील सर्वोत्तम गोल

मॅराडोनाचा हॅंड ऑफ गॉड गोल ब्रिटन तसेच युरोपातील माध्यमांनी जास्त प्रसिद्ध केला; पण १९८६ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मॅराडोनाने केलेला गोल विसाव्या शतकातील सर्वोत्तम गोल ठरवला गेला. मॅराडोना अर्जेंटिनाच्या क्षेत्रात चेंडू स्वीकारला आणि वेगाने ड्रिबल करीत चार इंग्लंड बचावपटूंना चकवले. त्याच्या वेगवान किकने इंग्लंडचा गोलरक्षक शिल्टन चकला. खरे तर मॅराडोनाने ज्या वेळी किक मारली, त्या वेळी इंग्लंडचा बचावपटू त्याच्या मार्गात होता; पण मॅराडोनाने चेंडू गोलजाळ्यात धाडला तो जवळपास झिरो अँगलमधून असेच अनेकांचे  मत होते.

 

संबंधित बातम्या