भक्कम अग्रस्थानासाठी चर्चिल ब्रदर्स प्रयत्नशील आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पंजाब एफसीला नमविण्याचा निर्धार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान भक्कम करण्यासाठी चर्चिल ब्रदर्स प्रयत्नशील असून त्यादृष्टीने मंगळवारी  पंजाब एफसी संघाला नमविण्याचा त्यांचा निर्धार आहे.

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान भक्कम करण्यासाठी चर्चिल ब्रदर्स प्रयत्नशील असून त्यादृष्टीने मंगळवारी  पंजाब एफसी संघाला नमविण्याचा त्यांचा निर्धार आहे. सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळला जाईल.

सध्या आय-लीग स्पर्धेत प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर चर्चिल ब्रदर्स, मोहम्मेडन स्पोर्टिंग आणि रियल काश्मीर यांचे समान चार गुण आहेत, मात्र चांगल्या गोलसरासरीमुळे गोव्याचा संघ अव्वल आहे. त्यांनी पहिल्या लढतीत इंडियन ॲरोजला ५-२ फरकाने हरविले, नंतर मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पंजाब एफसीने सुरवात विजयाने करताना ऐजॉल एफसीला १-० फरकाने हरविले, पण मागील लढतीत विश्रांतीला आघाडी घेऊनही गोकुळम केरळाकडून त्यांना ३-४ फरकाने हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांचे तीन गुण कायम आहेत.

चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले, की ‘‘प्रत्येक सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असून विजेतेपदासाठी दावा आहे. लक्ष्यप्राप्तीसाठी आम्ही अतिशय मेहनत घेत आहोत. आम्हाला आक्रमक शैलीने खेळत जास्तीत जास्त गोल करायचे आहेत, त्यासाठी गोलच्या अधिक संधी निर्माण करण्यावर भर राहील.’’ पंजाब एफसी हा चांगला संघ असून लढत उत्कंठावर्धक होण्याचे संकेत त्यांनी दिले.

पंजाब एफसीचे प्रशिक्षक कर्टिस फ्लेमिंग मागील लढतीतील निकालाने निराश आहे. पूर्वार्धात संघाने छान खेळ केला, पण उत्तरार्धात काम पूर्ण करणे जमले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. चुकांची पुनरावृत्ती न करता, बचावफळीतील कमजोरीवर मेहनत घ्यावी लागेल, असे त्यांनी नमूद केले.

 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सचे २ लढतीत ५ गोल, तर पंजाबचे ४ गोल

- चर्चिल ब्रदर्सच्या क्लेव्हिन झुनिगाचे ३ गोल

- गतमोसमात चर्चिल ब्रदर्सची पंजाबवर ३-० फरकाने मात

- पंजाबविरुद्धच्या मागील ३ लढतीत चर्चिल ब्रदर्सचे २ विजय

संबंधित बातम्या