माजी राष्ट्रीय ज्युनियर विजेते आनंद मडगावकर यांचे निधन

किशोर पेटकर
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

गोव्यातील बॅडमिंटनमध्ये त्यांनी बंधू अनिल मडगावकर यांच्या साथीत दबदबा राखला होता.

पणजी

माजी राष्ट्रीय ज्युनियर विजेते बॅडमिंटनपटू आनंद मडगावकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते भारताचे पहिले राष्ट्रीय विजेते बॅडमिंटनपटू विजय मडगावकर यांचे पूत्र होते.
आनंद यांनी १९६६ साली सत्पती रावत याच्या साथीत राष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत बाजी मारली होती. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ते राष्ट्रीय ज्युनियर सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेते ठरले होते. आनंद यांचे वडील विजय यांनी १९३४ साली राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकाविला होता.
मूळ गोमंतकीय असलेले आनंद सुरवातीस महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होते, नंतर ते गोव्यात परतले. गोव्यातील बॅडमिंटनमध्ये त्यांनी बंधू अनिल मडगावकर यांच्या साथीत दबदबा राखला होता. ते गोवा राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील विजेतेही होते, असे गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले. गोवा सरकारतर्फे राज्यातील क्रीडापटूंना उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला जाणाऱ्या बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर पुरस्काराचे आनंद मानकरी होते, पण नंतर राज्य सरकारला क्रीडा धोरण अंमलबजावणी करण्यास अपयश आल्याच्या कारणास्तव निषेध नोंदवत त्यांनी हा पुरस्कार सरकारला परत केला होता, अशी माहिती हेबळे यांनी दिली. ते विविध सामाजिक चळवळींतही भाग घेतला होता. आनंद यांच्या निधनाबद्दल गोवा बॅडमिंटन संघटनेने शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या