गोलंदाजी सुधारल्याने गोव्याचा राजस्थानवर विजय

गोलंदाजी सुधारल्याने गोव्याचा राजस्थानवर विजय
Goas victory over Rajasthan due to improved bowling

पणजी : गोलंदाजीतील परिणामकारक बदल आणि सुधारित कामगिरी यामुळे गोव्याने रविवारी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात दुसऱ्या विजयाची नोंद केली. अगोदरचे सलग तीन लढती जिंकलेल्या राजस्थानला ११७ धावांत गुंडाळून गोव्याने सामना ३७ धावांनी जिंकला.

सामना इंदूर (मध्य प्रदेश) येथील होळकर स्टेडियमवर झाला. नाणेफेक जिंकून गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५४ धावा केल्या. सलामीस बढती मिळालेल्या यष्टिरक्षक एकनाथ केरकर याच्या सर्वाधिक ३८ आणि सुयश प्रभुदेसाईने ३५ धावांचे योगदान देत गोव्याला दीडशेपार धावसंख्या रचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर अनुक्रमे अशोक डिंडा व दीपराज गावकर यांच्या जागी संघात आलेल्या विजेश प्रभुदेसाई व फेलिक्स आलेमाव यांनी लक्षय गर्ग, दर्शन मिसाळ व मलिक सिरूर यांच्यासह सुरेख मारा केला. त्यामुळे राजस्थानचा डाव १९.३ षटकांत गुंडाळणे गोव्याला शक्य झाले. विजेशने तीन, तर लक्षय व मलिक यांनी प्रत्येकी दोन, तसेच फेलिक्स व दर्शनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

गोव्याचा दुसरा विजय

गोव्याचा हा स्पर्धेतील चार सामन्यांतील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता आठ गुण झाले आहेत. गोव्याने यापूर्वी सेनादलास पाच विकेट राखून हरविले होते. गोव्याला मध्य प्रदेशकडून सहा धावांनी, तर सौराष्ट्रकडून ९० धावांनी हार पत्करावी लागली होती. त्यांचा स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना विदर्भाविरुद्ध होईल. अगोदरच्या लढतीत अनुक्रमे विदर्भ, मध्य प्रदेश व सेनादलास हरविलेल्या राजस्थानला रविवारी पहिला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे १२ गुण कायम राहिले.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ७ बाद १५४ (एकनाथ केरकर ३८- ३२ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, आदित्य कौशिक १९, स्नेहल कवठणकर ५, अमित वर्मा २२, अमोघ देसाई ७, सुयश प्रभुदेसाई ३५- २३ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, दर्शन मिसाळ १५, लक्षय गर्ग नाबाद ६,  मलिक सिरूर नाबाद १, अनिकेत चौधरी ४-०-२७-२, खलिल अहमद ४-०-३९-१, रवी बिष्णोई ४-०-२६-३) वि. वि. राजस्थान : १९.३ षटकांत सर्व बाद ११७ (भारत शर्मा १४, अंकित लांबा २१, अशोक मेणारिया २४, महिपाल लोमरोर १४, अनिकेत चौधरी ११, लक्षय गर्ग ४-०-२२-२, फेलिक्स आलेमाव ४-०-३५-१, विजेश प्रभुदेसाई ३.३-०-२८-३, दर्शन मिसाळ ४-०-१५-१, मलिक सिरूर ४-०-१५-२

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com