राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होणारच

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

‘कोविड’ महामारीमुळे नोव्हेंबरमध्ये जर ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नसल्या, तर २०२१मध्ये या स्पर्धा गोव्यात होणारच, असे निर्धारपूर्वक प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी मडगावात सांगितले.

फातोर्डा : ‘कोविड’ महामारीमुळे नोव्हेंबरमध्ये जर ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नसल्या, तर २०२१मध्ये या स्पर्धा गोव्यात होणारच, असे निर्धारपूर्वक प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी मडगावात सांगितले. बीपीएस स्‍पो‍टर्स क्लबने नव्याने तयार केलेल्या दोन सिंथेटिक टेनिस व एक बॅडमिंटन कोर्टचे उद्‍घाटन केल्यावर ते बोलत होते.

आम्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व साधनसुविधा पूर्ण केल्या आहेत. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनाने आदेश दिल्यावर लगेच या स्पर्धेचे आयोजन गोव्यात होईल. गोवा सरकारने याबाबत अजून ऑलिंपिक असोसिएशनशी संपर्क साधलेला नाही किंवा असोसिएशननेही आम्हाला काहीही कळवलेले नाही, असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

सरकार गोव्यात क्रीडा संस्कृती जपण्यास व त्याचा प्रसार करण्‍यास कटिबद्ध आहे. क्रीडा संस्थांना व क्रीडापटूंना सहाय्य करण्यासही सरकार बांधील असल्याचेही उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी पुढे सांगितले. 
गोव्यात क्रीडासंबंधी सर्व सुविधा उपलब्ध असूनही दर्जेदार खेळाडू तयार होत नाही, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी म्हटले. गोव्यातील क्रीडा संस्था, क्लबांनी पुढाकार घेऊन क्रीडापटूंचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. आपल्या कारकिर्दीत तयार कार्यान्वित केलेल्या क्रीडा योजनेचा अनेकांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले.

दिगंबर कामत

दक्षिण गोव्यात सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करण्याचा मान बीपीएस क्लबला लाभत आहे, याचा अभिमान वाटतो व क्लबच्या कारकिर्दीतील ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे आमदार व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.
क्लबचे अध्यक्ष संतोष जॉर्ज यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला व क्लबच्या संकुलात जलतरण तलाव व निवासी प्रकल्प राबविण्याचा संकल्प यावेळी सोडला. टेनिस कोर्ट तयार करण्यास गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून २० लाख रुपये अनुदान मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

या टेनिस कोर्टांचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्यावेळी सरावासाठी उपयोग केला जाईल. सध्‍या येथे १०० पेक्षा जास्त खेळाडू सराव करतात, असेही जॉर्ज म्हणाले. खजिनदार प्रसाद चिटणीस यांनी सर्वाचे आभार मानले.

संबंधित बातम्या