ईस्ट बंगालला अपराजित मालिका लांबविण्याची संधी
Opportunity to extend the unbeaten series to East Bengal

ईस्ट बंगालला अपराजित मालिका लांबविण्याची संधी

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात प्ले-ऑफ फेरीचे आव्हान राखण्यासाठी चेन्नईयीन एफसीला आगामी मोहिमेत विजय गरजेचा आहे, पण ईस्ट बंगालविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा नसेल. कोलकात्यातील संघ सहा सामने अपराजित असून मालिका लांबविण्यासाठी प्रयत्नशील असेल.

चेन्नईयीन व ईस्ट बंगाल यांच्यातील सामना सोमवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. चेन्नईयीनचे ११ लढतीनंतर १४ गुण असून तेवढेच सामने खेळलेल्या ईस्ट बंगालचे ११ गुण आहेत. उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील सामना गोलबरोबरीत राहिला होता.

चेन्नईयीनने मागील सामन्यात ओडिशा एफसीला हरविले. ईस्ट बंगालने इंज्युरी टाईम गोलमुळे केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले. १५ डिसेंबर रोजी हैदराबादकडून निसटता पराभव पत्करल्यानंतर रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सहा लढतीत पराभव पत्करलेला नाही.

त्यांची प्रगती चेन्नईयीनसाठी डोकेदुखी ठरू शकते. साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सातत्य राखण्यात कमी पडलेला आहे. त्यांनी अधिकाधिक गोल नोंदविण्याचे आणि विजयाचे लक्ष्य बाळगले आहे. ``आम्ही खूप सामने बरोबरीत राखले आहेत, जे जिंकायला हवे होते, पण मला वाटते मोसमाच्या उत्तरार्धात आम्ही मजबूत खेळू आणि संघ लढाऊ बाणा कायम राखून अधिक गोल नोंदवत सामना जिंकतील ही आशा आहे,`` असे लाझ्लो यांनी सांगितले.

``संघाचे मनोबल विलक्षण आहे. वाटचाल कायम राखत जे अपेक्षित आहे ते साध्य करायचे आहे. सामना गमवायचा नाही हे लक्ष्य असून त्यासाठी प्रयत्न आहेत,`` असे ईस्ट बंगालचे प्रशिक्षक फावलर यांनी नमूद केले.

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे २-२ गोलबरोबरी

- चेन्नईयीनचे ११ लढतीत ३ विजय, ५ बरोबरी, ३ पराभव

- ईस्ट बंगालचे ११ लढतीत २ विजय, ५ बरोबरी, ४ पराभव

- मागील ६ लढतीत ईस्ट बंगालचे २ विजय, ४ बरोबरी

- ईस्ट बंगालचे ११, चेन्नईयीनचे १० गोल

- चेन्नईयीनच्या ४, तर ईस्ट बंगालच्या २ क्लीन शीट्स

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com