अखेर ४० वर्षांनी मिळाले हक्काचे क्रीडांगण

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

मालकी हक्क मिळाल्‍याने विकासाचा मार्ग मोकळा : उपसभापतींच्‍या पाठपुराव्‍याला यश

सुभाष महाले
काणकोण

पैंगीण पंचायतीच्या बहुचर्चित पोटके क्रीडा मैदानाची जमीन अखेर चाळीस वर्षांनी पैंगीण पंचायतीच्या नावावर होऊन जमिनीचा मालकी हक्क पंचायतीकडे आला आहे. त्यामुळे आता क्रीडा मैदानाचा विकास करण्याचा मार्ग सुकर झाला.
१९८० मध्ये तत्कालीन सरपंच जगदीश आचार्य याच्या कारकिर्दीत कोमुनिदाद संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर क्रीडा मैदान उभारण्याच्या प्रयत्नांना सुरवात झाली. त्यानंतर उल्हास नाईक, जनार्दन भंडारी यानी सरपंचपदाच्या कारकिर्दीत त्याला चालना दिली. क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांच्या कारकिर्दीत हा क्रीडा प्रकल्प मूर्त रूप घेईल, अशी अपेक्षा होती. त्यावेळी पैंगीणचे सरपंच महेश नाईक होते. अनेकवेळा क्रीडा मैदानाचा प्रश्न ग्रामसभेत चर्चेत आला. एकूण ५६२५ चौरस मीटर जमीन पंचायतीच्या मालकीची आहे. त्यापैकी १५ हजार चौरस मीटर जमीन क्रीडा मैदानासाठी वापरून अन्य ५६२५ चौरसमीटर जमीन भविष्यकालीन पंचायत प्रकल्पासाठी जपून ठेवण्याचे ठरवण्यात आले.
जमिनीचा १/१४ च्या उताऱ्यावर पंचायतीचे नाव समाविष्ट केले आहे. यापूर्वी अनेकवेळा या मैदानाच्या विकासासाठी निविदा जाहीर झाल्या आहेत. मात्र, त्या कोणत्या आधारावर जाहीर झाल्या, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. जमिनीचा मालकी हक्क मिळाल्यानंतर पंचायतीने मैदानासंबंधी स्थापन केलेल्‍या पोटके मैदान विकास समितीची बैठक बोलाविण्यात आली. यावेळी जमीन पंचायतीच्या नावावर करून घेण्यास प्रमुख भूमिका बजावलेले गाळयेचे पंच प्रवीर भंडारी यांनी समितीला सर्व सोपस्काराची माहिती देऊन उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी जमीन नावावर करण्याच्या प्रक्रियेत मोठे योगदान दिल्याचे सांगितले. सरपंच जगदीश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला पंच सरिता पागी, विपीन प्रभूगावकर, माजी उपसरपंच सतीश पैंगीणकर, सुभाष महाले, प्रविण भट, अजित पैंगीणकर, गौरीश पैंगीणकर, व्यंकटराय नाईक, माजी सरपंच वल्लभ टेंगसे, सागर पेडणेकर, हरिष प्रभूगावकर व पंचायत सचिव राजीव नाईक गावकर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

पुढे काय..?
जमिनीचा मालकी हक्क मिळाल्याने त्वरीत क्रीडा मैदानाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे पंचायत मंडळाने ठरवले आहे. त्यासाठी जमिनीचे सपाटीकरण, दगडी कुंपण, प्रसाधनगृह, फुटबॉल व क्रिकेट मैदान व अन्य मूलभूत सोयीसह मैदानाची उभारणी करण्याचा प्रस्ताव समिती व पंचायत मंडळातर्फे काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना देण्याचे ठरवण्यात आले.

संबंधित बातम्या