गोव्याचा लिऑन चौदाव्या वर्षी ग्रँडमास्टर

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

गोव्याचा 14 वर्षीय बुद्धिबळपटू लिऑन मेंडोंसा ग्रँडमास्टर किताबासाठी पात्र ठरला आहे. इटलीतील स्पर्धेत त्याने या किताबासाठी आवश्यक तिसरा नॉर्म प्राप्त केला.

पणजी : गोव्याचा 14 वर्षीय बुद्धिबळपटू लिऑन मेंडोंसा ग्रँडमास्टर किताबासाठी पात्र ठरला आहे. इटलीतील स्पर्धेत त्याने या किताबासाठी आवश्यक तिसरा नॉर्म प्राप्त केला. कोविड-१९ लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून युरोपात अडकल्यानंतर तेथील स्पर्धेत खेळत त्याने स्वप्नपूर्ती केली.

अनुराग म्हामल (2017 मध्ये) याच्यानंतर लिऑन गोव्याचा दुसरा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आहे. एकंदरीत तो देशाचा 67वा ग्रँडमास्टर असेल. 14 वर्षे, 9 महिने आणि 17 दिवसांचा असताना त्याने ग्रँडमास्टर किताबासाठी पात्रता मिळविली. चेन्नईचा जी. आकाश या वर्षी जुलैमध्ये भारताचा 66वा ग्रँडमास्टर ठरला होता.

लिऑनने 2020 मध्येच ग्रँडमास्टर किताबाचे तिन्ही नॉर्म प्राप्त केले. मार्चमध्ये कोविड-19 लॉकडाऊनमुळे वडील लिंडन यांच्यासह युरोपात अडकल्यानंतर, तेथील बुद्धिबळ स्पर्धेत खेळत त्याने ग्रँडमास्टर किताबाचे स्वप्न पूर्ण केले. या वर्षी ऑक्टोबरमध्ये हंगेरीतील रिगो चेस राऊंड रॉबिन स्पर्धेत पहिला, तर नोव्हेंबरमध्ये बुडापेस्ट येथील फर्स्ट सॅटरडे स्पर्धेत दुसरा नॉर्म प्राप्त केला. इटलीतील व्हर्गानी स्पर्धेत मावळत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात खेळत त्याने ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळविला. या स्पर्धेत त्याने साडेसहा गुणांसह उपविजेतेपद मिळविले. युक्रेनचा व्हिताली बर्नाडस्की (सात गुण) विजेता ठरला.

मार्च ते डिसेंबर या कालावधीत लिऑन युरोपात एकूण 16 बुद्धिबळ स्पर्धा खेळला. त्याने एलो गुणांत 2452 वरून 2544 पर्यंत प्रगती साधली आहे. ``होय, ग्रँडमास्टर बनल्याने मी आनंदित आहे. अतिशय खडतर मेहनतीनंतर स्वप्न साकारले आहे. पालकांसह सहकार्य करणारे सारे लोक, प्रशिक्षक विष्णू प्रसन्न, पुरस्कर्ते यांचा मी ऋणी आहे,`` अशी प्रतिक्रिया लिऑनने इटली येथून दिली.

 
 

संबंधित बातम्या