`ऑल इंडिया` एफसी गोवाचा लढाऊ बाणा

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स फुटबॉल लीग स्पर्धेच्या ई गटातील शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी लढाऊ बाणा प्रदर्शित करताना संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबला झुंजविले, अखेरीस उत्तरार्धातील गोलमुळे अबुधाबीच्या संघाने 2-0 फरकाने विजय नोंदविला.

पणजी: भारतातील कोविड-19 परिस्थितीने उग्र रूप धारण केल्याने आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंधामुळे परदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशी रवाना झाल्यानंतर एफसी गोवाने गुरुवारी रात्री सर्व भारतीय खेळाडूंचा संघ मैदानात उतरविला. त्यानंतर आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स फुटबॉल लीग स्पर्धेच्या ई गटातील शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी लढाऊ बाणा प्रदर्शित करताना संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबला झुंजविले, अखेरीस उत्तरार्धातील गोलमुळे अबुधाबीच्या संघाने 2-0 फरकाने विजय नोंदविला.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ओमर ख्रिबिन याने 61व्या मिनिटास आणि महम्मद अल मेनहाली याने 90व्या मिनिटास केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे अल वाहदा क्लबला विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त करता आले. 

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एफसी गोवाने अल वाहदा क्लबने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. गुरुवारी रात्री तासाभराच्या खेळात माजी आयएसएल उपविजेत्यांनी संयुक्त अरब अमिरातीतील संघाला गोलशून्य रोखले होते, मात्र नंतर गोल स्वीकारल्यामुळे एफसी गोवास स्पर्धेतील तिसरा पराभव पत्करावा लागला, मात्र तीन गुणांसह त्यांनी चार संघांच्या गटात तिसरे स्थान मिळविले. अल वाहदा क्लबचा हा सहा लढतीतील चौथा विजय ठरला. त्यांचे 13 गुण झाले. इराणच्या पर्सेपोलिस (15 गुण) संघानंतर त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. सर्वोत्तम गट उपविजेता संघ या नात्याने त्यांना स्पर्धेच्या राऊंड ऑफ 16 फेरीची संधी असेल. कतारचा अल रय्यान क्लब दोन गुणांसह शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला.

AFC Champions League: धडाकेबाज विजयासह पर्सेपोलिसची आगेकूच 

सामन्याच्या तासाभराच्या खेळानंतर अल वाहदा क्लबने अखेर आघाडी प्राप्त केली. उत्तरार्धात अल वाहदाचा सीरियन खेळाडू ओमर ख्रिबिन याचे चांगले प्रयत्न हुकले, मात्र 61व्या मिनिटास त्याने गोलबॉक्सच्या मध्यातून मारलेल्या सणसणीत फटक्यावर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याला चेंडू अडविण्याची अजिबात संधी दिली नाही. सीरियाच्या या 27 वर्षीय आंतरराष्ट्रीय विंगरने टिम माताझ याच्या असिस्टवर यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा गोल केला. 

सामन्याच्या 69व्या मिनिटास एफसी गोवाचा हुकमी गोलरक्षक धीरज सिंगने दुखापतीमुळे मैदान सोडले, त्याची जागा बदली गोलरक्षक नवीन कुमार याने घेतली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटास ओमर ख्रिबिन याच्या असिस्टवर महम्मद अल मेनहाली याचा डाव्या पायाचा फटका नेटमध्ये घुसला आणि अल वाहदा क्लबच्या खाती आणखी एका गोलची नोंद झाली.

कोरोनाशी लढा: राजस्थान संघाकडून भारताला मोठी मदत 

भारतीय खेळाडूंची पूर्वार्धात चमक

मागील लढतीत बलाढ्य पर्सेपोलिस संघाला नमविलेल्या अल वाहदा क्लबला गुरुवारी एफसी गोवाच्या भारतीय फुटबॉलपटूंनी गोलसाठी झुंजविले. त्यामुळे सामन्यातील पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात संयुक्त अरब अमिरातीतल संघास गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. एफसी गोवाने बचावावर जास्त लक्ष केंद्रित करताना अल वाहदा क्लबच्या आक्रमणावर सक्त पहारा ठेवला, त्यामुळे त्यांना खेळावर वर्चस्व राखूनही गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. गोलरक्षक धीरज सिंगने दक्ष राहत अल वाहदाच्या टिम माताझ व ओमर ख्रिबिन यांचे प्रयत्न हाणून पाडले. स्पॅनिश एदू बेदिया याच्या अनुपस्थितीत गोमंतकीय बचावपटू सेरिटन फर्नांडिस याने एफसी गोवाचे नेतृत्व केले, तर हुआन फेरांडो नसल्यामुळे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू गोव्याचे क्लिफर्ड मिरांडा यांनी अंतरिम प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली.

संबंधित बातम्या