भारतात परतण्याचे उद्दिष्ट साध्य :पंडिता

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

स्पेनमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळत असताना आंतराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी या हेतूने मायदेशी परतलो.

पणजी: स्पेनमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळत असताना आंतराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी या हेतूने मायदेशी परतलो, राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाल्याने उद्दिष्ट साध्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया एफसी गोवाचा युवा आघाडीपटू ईशान पंडिता याने बुधवारी दिली. आभासी पद्धतीने झालेल्या पत्रकार परिषदेत या 22 वर्षीय आक्रमक खेळाडूने निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.

भारताच्या ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीसाठी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 35 सदस्यीय संभाव्य संघ जाहीर केला असून त्यात आघाडीफळीत अनुभवी सुनील छेत्री आणि मनवीर सिंग यांच्यासमवेत ईशान पंडिता याला स्थान मिळाले आहे. भारताचे सामने अनुक्रमे 25 व 29 मार्च रोजी दुबई येथे खेळले जातील. यंदाच्या आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी पंडिताचा बदली खेळाडू (सुपर सब) या नात्याने मोठ्या खुबीने वापर केला. या प्रतिभाशाली खेळाडूने आयएसएल स्पर्धेतील नऊ सामन्यांत चार गोल केले आणि प्रत्येकवेळी एफसी गोवास पराभवाच्या खाईतून वाचविले. सर्व गोल त्याने सामन्यातील अखेरची काही मिनिटे बाकी असताना नोंदविले.

I League : चर्चिल ब्रदर्सची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम शुक्रवारपासून

फुटबॉलसाठीच पुन्हा भारतात

``स्पेनमध्ये फुटबॉल कारकीर्द बहरत असताना भारतात व्यावसायिक फुटबॉल खेळण्यासाठी येण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय संघात जागा मिळविणे हेच होते. आयएसएलमधील लक्षवेधक कामगिरीनंतर राष्ट्रीय संघासाठी संधी मिळण्याची अपेक्षा होती, ती मिळाल्याबद्दल स्वतःला नशीबवान मानतो आणि आभारीही आहे,`` असे पंडिता म्हणाला. मूळ जम्मू-काश्मीरचा, नवी दिल्लीत जन्मलेला ईशान पंडिता फिलिपिन्स, बंगळूर असा प्रवास करत 2014 साली स्पेनमध्ये प्रगत फुटबॉलसाठी दाखल झाला. 2016 साली सीडी लेगानेस या ला-लिगा संघाकडून 19 वर्षांखालील संघासाठी व्यावसायिक करार मिळाला. त्यापूर्व तो स्पेनमधील यूडी अल्मेरियाच्या अकादमीत होता. ईशानने नास्टिक द तारागोना, तसेच लॉर्सा एफसी या स्पॅनिश संघांचे प्रतिनिधित्व केले. 2020 मध्ये एफसी गोवाने करारबद्ध केल्यानंतर भारतात तो प्रथमच व्यावसायिक फुटबॉल खेळत आहे.

डेल स्टेनच्या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेची मोठी प्रतिक्रीया

महत्त्वपूर्ण गोल केल्याचे समाधान

``आपण पूर्णतः आक्रमक खेळाडू असून या जागी खेळ बहरतो, स्पेनमध्ये सुरवातीस काही वेळा विंगर या जागी खेळलो असलो, तरी फुटबॉल मैदानावर आपली मानसिकता पूर्णपणे आक्रमक असते, गोल करण्यासाठी ताकदवान डोके आवश्यक आहे,`` असे पंडिताने नमूद केले. एफसी गोवातर्फे बदली खेळाडू या नात्याने मोजकीच मिनिटे संधी मिळाली असली, तरी महत्त्वपूर्ण गोल नोंदवून संघासाठी उपयुक्त योगदान दिल्याचे जास्त समाधान आहे, असे एफसी गोवाच्या 26 क्रमांकाच्या जर्सीत खेळणारा खेळाडू म्हणाला.

संबंधित बातम्या