मुंबई सिटीकडून ईस्ट बंगालचा धुव्वा

Adams two Santanas one goal in the sixth professional matchAdams two Santanas one goal in the sixth professional match
Adams two Santanas one goal in the sixth professional matchAdams two Santanas one goal in the sixth professional match

पणजी : व्यावसायिक कारकिर्दीतील सहाशेवा सामना खेळणारा इंग्लंडचा अॅडम ली फाँड्रे याचे दोन आणि स्पॅनिश हर्नान सांताना याच्या एका गोलच्या बळावर मुंबई सिटी एफसीने मंगळवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एकतर्फी दणदणीत विजय नोंदविला. स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या कोलकात्याच्या ईस्ट बंगालचा त्यांनी 3-0 फरकाने धुव्वा उडविला.

सामना मंगळवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. सिडनी एफसीकडून लोनवर आयएसएल स्पर्धेत खेळणाऱ्या 33 वर्षीय फाँड्रे याने पहिला गोल 20व्या मिनिटास केला, नंतर 48व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर संघाची आघाडी वाढविली. 58व्या मिनिटास 30 वर्षीय हर्नान सांताना याने संघाची आघाडी मजबूत केली. मध्यफळीत चमकदार अष्टपैलू खेळ केलेला फ्रेंच खेळाडू ह्यूगो बुमूस सामन्याचा मानकरी ठरला. त्याने तीन असिस्टची नोंद केली.

सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीने सलग दुसरा विजय नोंदवत गुणसंख्या सहावर नेत एटीके मोहन बागानला गाठले. आज त्यांनी सुरेख सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना साफ निष्प्रभ केले. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालला ओळीने दुसरा पराभव पत्करावा लागला. ईस्ट बंगालला सुरवातीसच धक्का बसला. त्यांचा कर्णधार डॅनियल फॉक्स याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा महंमद रफीक याने घेतली.

सामन्याच्या विसाव्या मिनिटास शानदार प्रतिहल्ल्यावर मुंबई सिटीने आघाडी साधली. रॉवलिन बोर्जिसने दिलेल्या पासवर ह्यूगो बुमूस याने जोरदार मुसंडी मारत ईस्ट बंगालच्या बचावास पूर्णपणे उघडे पाडले. नंतर गोलरक्षकास गुंगारा देत चेंडू फाँड्रेच्या दिशेने पास केला. इंग्लिश खेळाडूने मोकळ्या नेटमध्ये चेंडू मारताना अजिबात चूक केली नाही. विश्रांतीनंतरच्या दुसऱ्याच मिनिटास ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याने मुंबईच्या बुमूस याला अडथळा आणला. रेफरी तेजस नागवेकर याने पेनल्टी फटक्याची खूण केल्यानंतर, फाँड्रे याने गोलरक्षकाचा अंदाज चुकवत गोल केला. त्यानंतर दहा मिनिटांनी नियोजनबद्ध सेटपिसेसवर मुंबईच्या खाती तिसरा गोल जमा झाला. अहमद जाहूच्या अप्रतिम फ्रीकिकवर बुमूसने व्हॉली फटक्यावर चेंडू सांतानच्या दिशेने मारला. स्पॅनिश खेळाडूच्या वेगवान फटक्यासमोर गोलरक्षक मजुमदार पूर्णतः हतबल ठरला.

ईस्ट बंगालने मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याची एकदाच परीक्षा पाहिली. १९व्या मिनिटास रफीक याने सणसणीत फटका मारली, पण अमरिंदरने आपल्या डाव्या बाजूने पूर्णपणे झेपावत संघावरील संकट टाळले.

मंदारचे शतक!

आयएसएल स्पर्धेत सर्वप्रथम 100 सामने खेळण्याचा पराक्रम मंगळवारी गोमंतकीय मंदार राव देसाई याने साधला. हा 28 वर्षीय बचावपटू एफसी गोवातर्फे 2014 ते 2019-20 या कालावधीत 97 आयएसएल सामने खेळला. यंदा मुंबई सिटीतर्फे सलग तीन सामने खेळत त्याने सामन्यांचे शतक पूर्ण केले. त्याने आयएसएल स्पर्धेत 6 गोलही नोंदविले आहेत.

दृष्टिक्षेपात...

- अॅडम ली फाँड्रे याचे यंदाच्या आयएसएलमध्ये 3 गोल

- हर्नान सांताना याचा आयएसएलमध्ये पहिलाच गोल

- मुंबई सिटीचे 3 लढतीत 2 विजय, 1 पराभव, 6 गुण

- ईस्ट बंगालचे सलग 2 पराभव

- सामन्यात मुंबई सिटीचे 456, तर ईस्ट बंगालचे 365 पास

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com