राष्ट्रीय स्पर्धेसाठी पर्यायी पात्रता निकषांचा अवलंब : आयओए

national games goa logo
national games goa logo

पणजी,

कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे देशातील क्रीडा मैदाने ठप्प झाली, त्याचा परिणाम आगामी ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पात्रता स्पर्धांवरही झालेला आहे, मात्र या संदर्भात भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) तोडगा काढण्याची ग्वाही देताना पर्यायी पात्रता निकष अवलंबिण्याचे सूचित केले आहे.

आयओएचे सचिव राजीव मेहता यांनी गतआठवड्यात गोवा प्रशासनाला स्पर्धा आयोजनासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यात ठरल्यानुसार या वर्षीच २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा घेणाचे, त्यासाठी तयारीचा वेग वाढविण्याचा सल्ला देताना, स्पर्धा वारंवार लांबणीवर पडणे चिंताजनक असल्याचेही मेहता यांनी पत्रात बजावले आहे.

या पत्रात राजीव मेहता यांनी लॉकडाऊनमुळे क्रीडा जगतास फटका बसल्याचे आणि काही राष्ट्रीय स्पर्धा रद्द कराव्या लागल्याचे नमूद केले आहे. ‘‘गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा होण्याबाबत आयओएचे सदस्य राष्ट्रीय क्रीडा महासंघ आतुरतेने वाट पाहत आहेत. पात्रता स्पर्धा घेणे शक्य नसल्यास, ठरलेल्या वेळेत एखाद्या खेळाची प्रवेशिका मान्यता सुलभ करण्यासाठी पर्यायी पात्रता निकष अंगीकारण्याबाबत महासंघाच्या सहकार्याने आयओए काम करेल,’’ असे मेहता यांनी गोवा सरकारला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

देशातील कोविड-१९ लॉकडाऊन ४.० मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने खेळाडूंच्या सरावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. सरावासाठी विविध खेळांची संपर्कविना, मध्यम शरीर संपर्क, अप्रत्यक्ष संपर्क, थेट शरीर संपर्क, वॉटर स्पोर्टस अशी विभागणी करण्यात आली असून त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वांचे आचरण करत सराव शिबिरे होतील. सरावास परवानगी मिळाली, पण देशातील स्पर्धा नक्की कधी सुरू होतील याबाबत अजून स्पष्टता नाही. त्यामुळे गोव्यात पाच महिन्यानंतर होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत सध्यातरी धुसरता आहे. त्यातच स्पर्धेसाठी गोवा अजून पूर्णपणे सज्ज झालेला नसून राज्य प्रशासनाने सर्व सुविधा ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे आयओएला आश्वासन दिले आहे.

आयओएने यावर्षी १० फेब्रुवारीस गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पात्रता निकष परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार प्रत्येक खेळात २०१९-२० आर्थिक वर्षात घेतलेल्या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेतील पहिले उत्कृष्ट सात संघ अथवा वैयक्तिक खेळाडू पात्र ठरतील. आठवी प्रवेशिका यजमान गोव्याची असेल. ॲथलेटिक्स, नेमबाजी आणि बॉक्सिंगमधील संघ-खेळाडूंची संख्या संबंधित राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या शिफारसीने मागील स्पर्धा निकषांनुसार आयओए सचिव मंजूर करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com