AFC Champions 2021: एफसी गोवाचे खेळाडू थकलेत - फेरांडो

AFC Champions 2021 FC Goa players tired  Ferrando
AFC Champions 2021 FC Goa players tired Ferrando

पणजी: एफसी गोवाचे खेळाडू थकल्यामुळे पर्सेपोलिस संघाविरुद्ध पराभव झाल्याचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी मान्य केले. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सलग दोन बरोबरीनंतर मंगळवारी रात्री गोव्यातील संघाने पहिला पराभव पत्करला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या ई गटातील लढतीत एदू बेदियाच्या गोलमुळे आघाडी घेतल्यानंतर एफसी गोवास इराणच्या विजेत्या संघाविरुद्ध सामना 2-1 फरकाने गमवावा लागला. (AFC Champions 2021 FC Goa players tired  Ferrando)

स्पर्धेत प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर पर्सेपोलिस संघाचे सलग तीन विजयासह सर्वाधिक नऊ, संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदाचे चार, एफसी गोवाचे दोन, तर कतारच्या अल रय्यान क्लबचा फक्त एक गुण आहे. गटातील परतीचे सामने शुक्रवारपासून फातोर्डा येथेच खेळले जातील. सामन्यानंतर 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकाने सांगितले, की ``आमचे खेळाडू दमलेत आणि दुखापतीसह खेळत आहेत. तुम्ही 100 टक्के तंदुरुस्त नसाल, तर खेळणे कठीण ठरते. खेळाडूंना मिळालेले यलो कार्ड या बाबीही आहेत.``

खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत फेरांडो यांनी अधिक विस्तृतपणे सांगितले, की ``65व्या मिनिटास काही खेळाडूंनी मला सांगितले की त्यांचे पाय चालेनात. ब्रँडनने (फर्नांडिस) धावण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला कठीण ठरले, ग्लॅन (मार्टिन्स) सुद्धा थकला होता. प्रत्येकजण संघर्ष करत होता. अशा परिस्थितीत, तुमचे पाय दमलेत आणि स्टेडियमवर चाहते असतील, तर खूपच बदल घडू शकतो, पण ही स्थिती नाही आणि आम्हाला ते स्वीकारावे लागेल.`` कोविड-19 मुळे गोव्यात सुरू असलेल्या या स्पर्धेतील सामने बंद दरवाजाआड रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जात आहेत.

पासिंगमधील चुकांची सल

आशियातील एक उत्कृष्ट संघ असलेल्या पर्सेपोलिसविरुद्ध खेळलो, पण निकालावर समाधानी नसल्याचे फेरांडो यांनी स्पष्ट केले. एफसी गोवाच्या मार्गदर्शकास पासिंगमधील त्रुटी सलत आहेत. ``सामन्यात आम्ही पासिंगमध्ये, तसेच इतर क्षेत्रातही बऱ्याच चुका केल्या,`` असे फेरांडो म्हणाले. परतीच्या लढतीत एफसी गोवा शुक्रवारी पर्सेपोलिस एफसीविरुद्ध फातोर्डा येथे खेळेल.

खडतर विजय : गोलमोहम्मदी

एफसी गोवाविरुद्धचा विजय खडतर ठरल्याचे पर्सेपोलिस संघाचे मुख्य प्रशिक्षक याह्या गोलमोहम्मदी यांनी कबुल केले. आपला संघ एफसी गोवाविरुद्धची मोहीम सफल ठरवेल याचा विश्वास होता, पण भारतीय संघाने नमविण्यास खूपच कठीण असल्याचे सिद्ध केले, असे गोलमोहम्मदी म्हणाले. ``प्रत्येकाला वाटत होते, की पर्सेपोलिससाठी हा सामना सोपा असेल, मात्र मुख्य प्रशिक्षक या नात्याने सामना अवघड असल्याचे मी जाणून होतो. पिछाडीवर पडूनही आम्ही पूर्वार्धात सामन्यावर नियंत्रण राखले आणि उत्तरार्धात सामन्याचा वेग नियंत्रित केला, तसेच खेळाडूंही शरणागती पत्करली नाही,`` असे इराणचे माजी आंतरराष्ट्रीय बचावपटू म्हणाले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com