AFC Champions League: एफसी गोवाचा विक्रमी विजय हुकला

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सामना जिंकणारा पहिला भारतीय क्लब हा मान एफसी गोवा संघाला सोमवारी रात्री अगदी थोडक्यात हुकला.

पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सामना जिंकणारा पहिला भारतीय क्लब हा मान एफसी गोवा संघाला सोमवारी रात्री अगदी थोडक्यात हुकला. सामन्याच्या 89 व्या मिनिटास बदली खेळाडू अली फेरीदून याने नोंदविलेल्या गोलमुळे कतारच्या अल रय्यान क्लबने त्यांना पिछाडीवरून 1-1 गोलबरोबरीत रोखले. ई गटातील सामन्यात, फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा संघ ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच करत होता. 69व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरलेल्या फेरीदून याने संधी साधली व भारतीय संघाचे स्वप्न भंगले. फेरीदून याचा फटका एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याने रोखला, पण फेरीदून याने रिबाऊंडवर अगदी जवळून संधी साधली.  (AFC Champions Leagu: FC Goa lost)

AFC Champions League: अल वाहदाने पर्सेपोलिसची विजयी घोडदौड रोखली

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास एफसी गोवाने जल्लोष केला. हुकमी मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिसच्या असिस्टवर स्पॅनिश खेळाडू होर्गे ओर्तिझने स्थानिक संघाला आघाडी मिळवून दिली. या 29 वर्षीय विंगरने अल रय्यानचा गोलरक्षक सौद अब्दुल्ला याने जागा सोडल्याची सुरेख संधी साधली. त्याचा डाव्या पायाचा फटका अचूक ठरला. स्पॅनिश हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने आज शिस्तबद्ध केला, तसेच बचावातही जास्त लक्ष केंद्रित केले. पर्सेपोलिसविरुद्ध मागील लढतीत चार गोलनी पराभूत झालेल्या एफसी गोवा संघात सोमवारच्या लढतीसाठी विश्रांती दिलेले सर्व प्रमुख खेळाडू दाखल झाले, त्यामुळे त्यांची ताकद वाढली. एफसी गोवाचा हा स्पर्धेतील तिसरा बरोबरीचा सामना ठरला. त्यामुळे त्यांचे पाच लढतीनंतर तीन गुण झाले आहेत. पर्सेपोलिस (12 गुण) व अल वाहदा (10 गुण) यांच्यानंतर एफसी गोवा तिसऱ्या स्थानी आहे.

फ्रान्सचे 1998 मधील विश्वकरंडक विजेते लॉरें ब्लांक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या कतारच्या माजी स्टार लीग विजेत्यांनी अंतिम टप्प्यात आक्रमणावर भर दिला. दहाव्यांदा एएफसी चँपियन्स लीगमध्ये खेळणाऱ्या या संघाची ही पाच लढतीतील दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे दोन गुण झाले. पहिल्या टप्प्यात एफसी गोवाने अल रय्यानला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. मागील लढतीत रेड कार्ड मिळालेल्या अहमद अल सय्यद व फ्रांक कोम यांच्या निलंबनामुळे त्यांच्याविना अल रय्यान क्लबला मैदानात उतरावे लागले.

Goa Professional League: सेझा अकादमी विलगीकरणात

पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममध्ये प्रतिहल्ल्यावर एफसी गोवाच्या ईशान पंडिता याला संधी होती, पण त्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी गोलरक्षकाने रोखला. सामन्याच्या ४०व्या मिनिटास एफसी गोवाचा बचावपटू इव्हान गोन्झालेझ याला यलो कार्ड मिळाले. स्पर्धेतील दुसऱ्या यलो कार्डमुळे तो पुढील सामना खेळू शकणार नाही. सामन्याच्या ७२व्या मिनिटास रोमियो फर्नांडिसच्या असिस्टवर ग्लॅन मार्टिन्सला चांगली संधी होती, पण त्याचा फटका बराच उंचावरून गेल्यामुळे एफसी गोवाची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. 90+2 मिनिटास एफसी गोवाचा बदली खेळाडू रोमियो फर्नांडिस अचूक फटका मारू शकला नाही, तर 90+4 मिनिटास अल रय्यानच्या खालिद मुफ्ताह याचा धोकादायक प्रयत्न गोलरक्षक धीरज सिंगने रोखल्यामुळे 1-1 बरोबरी कायम राहिली. एफसी गोवाचा ई गटातील शेवटचा सामना शुक्रवारी (ता. 29) संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबविरुद्ध होईल. त्याचदिवशी अल रय्यान इराणच्या पर्सेपोलिस संघाविरुद्ध खेळेल.

 दृष्टिक्षेपात
- एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत एफसी गोवातर्फे गोल नोंदविणारा होर्गे   ओर्तिझ दुसरा फुटबॉलपटू
- एफसी गोवाचे स्पर्धेतील दोन्ही गोल ब्रँडन फर्नांडिसच्या असिस्टवर
- एफसी गोवाचे स्पर्धेत 2, तर अल रय्यानचे 4 गोल
- एफसी गोवाचे 5 लढतीत 3 बरोबरी, 2 पराभव, 3 गुण
- अल रय्यानचे 5 लढतीत 2 बरोबरी, 3 पराभव, 2 गुण
 

संबंधित बातम्या