AFC champions league 2021: गोव्यात चँपियन्स लीगचे सामनेही बंद दरवाज्याआड

AFC champions league 2021: गोव्यात चँपियन्स लीगचे सामनेही बंद दरवाज्याआड
AFC champions league 2021 Asian Champions League matches will be played behind closed doors for corona security reasons

पणजी: गोव्यात कोरोना विषाणू महामारी बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, या कारणास्तव एप्रिलमध्ये राज्यात होणारे आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामनेही सुरक्षेच्या कारणास्तव बंद दरवाज्याआड खेळले जातील. यासंदर्भात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निश्चित केले आहे.

आशियाई फुटबॉल महासंघाची (एएफसी) चँपियन्स लीग सामने बंद दरवाज्याआड खेळविण्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल. स्पर्धेच्या ई गटातील (पश्चिम विभाग) सामने येत्या 14 ते 30 एप्रिल या कालावधीत खेळले जातील. सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळले जातील. काही सामने बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होण्याचेही संकेत आहेत.

गोव्यात कोविड-19 बाधितांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी 200 नवे बाधित आढळले. राज्यात कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याने स्टेडियमवर फुटबॉलप्रेमींना प्रवेश देणे चुकीचे ठरेल असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला वाटत आहे. स्टेडियमच्या आत सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश देणे धोकादायक ठरू शकते. ही स्पर्धा कोणत्याही अडथळ्याविना होणे महत्त्वाचे आहे, असे महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने नमूद केले. स्पर्धेतील सामने संध्याकाळी 5.30 वाजता व रात्री 8.30 वाजता खेळले जातील.

आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटात एफसी गोवासह इराणचा पर्सेपोलिस एफसी, कतारचा अल रय्यान स्पोर्टस क्लब यांचा समावेश आहे. चौथा संघ अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती) व अल झावरा (इराक) यांच्यातील प्ले-ऑफ लढतीनंतर निश्चित होईल. हा सामना सात एप्रिलला होईल. पर्सेपोलिस संघ गतवेळचा आशियाई चँपियन्स लीग उपविजेता संघ आहे.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत 2019-20 मोसमात लीन विनर्स शिल्ड पटकावून एफसी गोवा आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणारा पहिला भारतीय संघ ठरला आहे. सामने गोव्यात होणार असल्यामुळे एफसी गोवा संघाला गटसाखळी सामने घरच्या मैदानावर खेळायला मिळतील. आशियाई फुटबॉल महासंघाची गोव्यात होणारी ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे.

आयएसएलही रिकाम्या स्टेडियमवर रंगली

गोव्यात गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर ते या वर्षी 13 मार्चपर्यंत 2020-21 मोसमातील आयएसएल स्पर्धेचे आयोजन झाले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी स्टेडियम, वास्को येथील टिळक मैदान या तीन स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात स्पर्धा रंगली. या स्पर्धेतील एकूण 115 सामने जैवसुरक्षा वातावरणात बंद दरवाज्याआड प्रेक्षकांविना झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com