AFC champions league 2021: एफसी गोवा संघात मोठे बदल

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या 2020-21 मोसमात सर्वाधिक गोलसाठी गोल्डन बूट पटकाविलेला इगोर आंगुलो आणि सर्वोत्तम विनिंग पासचा मानकरी आल्बर्टो नोगेरा या स्पॅनिश खेळाडूंविना एफसी गोवा संघ आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणार आहे.

पणजी:  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या 2020-21 मोसमात सर्वाधिक गोलसाठी गोल्डन बूट पटकाविलेला इगोर आंगुलो आणि सर्वोत्तम विनिंग पासचा मानकरी आल्बर्टो नोगेरा या स्पॅनिश खेळाडूंविना एफसी गोवा संघ आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणार आहे.  स्पर्धेच्या नियमानुसार संघात चार परदेशी खेळाडूंना मुभा असल्याने आंगुलो व नोगेरा या अनुभवी खेळाडूंना संधी मिळू शकली नाही. चँपियन्स लीग स्पर्धेसाठी आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) 28 सदस्यीय खेळाडूंची यादी सादर केल्यानंतर हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने गुरुवारी संघ जाहीर केला.

AFC champions league 2021:गोव्यात पहिल्यांदाच फुटबॉलचे सामने रात्री उशिरा

आशियाई चँपियन्स लीग स्पर्धा 14 ते 30 एप्रिल या कालावधीत गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळली जाईल. स्पर्धेतील गतउपविजेता इराणचा पर्सेपोलिस, कतारचा अल रय्यान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा यांच्यासह एफसी गोवाचा ई गटात (पश्चिम विभाग) समावेश आहे. चँपियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविणारा एफसी गोवा हा पहिला भारतीय फुटबॉल संघ आहे.

आशियाई चँपियन्स लीग स्पर्धा नियमानुसार, परदेशी खेळाडूत एक खेळाडू एएफसी सदस्य देशाचा असणे आवश्यक आहे. एफसी गोवा संघात ही जागा ऑस्ट्रेलियन बचावपटू जेम्स डोनाकी याला मिळाली आहे. बचावपटू इव्हान गोन्झालेझ, मध्यरक्षक एदू बेदिया आणि आघाडीपटू होर्गे ओर्तिझ हे स्पॅनिश खेळाडू संघातील अन्य परदेशी आहेत. संघात गोव्यातील एकूण 11 खेळाडू आहेत.

 

रोमियोचे पुनरागमन
 मध्यरक्षक रोमियो फर्नांडिस याने एफसी गोवा संघात पुनरागमन केले आहे. हा 28 वर्षीय मध्यरक्षक 2014 ते  2016 पर्यंत एफसी गोवा संघाचा प्रमुख खेळाडू होता.

आशियाई चँपियन्स लीगसाठी एफसी गोवा संघ
गोलरक्षक : महंमद नवाझ, नवीन कुमार, शुभम धस, धीरजसिंग मोईरांगथेम
बचावपटू : सॅनसन परेरा, सेरिटन फर्नांडिस, लिअँडर डिकुन्हा, इव्हान गोन्झालेझ (स्पेन), महंमद अली, जेम्स डोनाकी (ऑस्ट्रेलिया), ऐबान्भा डोहलिंग, सेवियर गामा, आदिल खान
मध्यरक्षक : एदू बेदिया (स्पेन), ग्लॅन मार्टिन्स, प्रिन्सटन रिबेलो, ब्रँडन फर्नांडिस, फ्रांग्की बुआम, रेडीम ट्लांग, माकन विंकल चोथे, अलेक्झांडर रोमारियो जेसूराज, अमरजितसिंग कियाम, रोमियो फर्नांडिस, आघाडीपटू होर्गे ओर्तिझ (स्पेन), देवेंद्र मुरगावकर, ईशान पंडिता.

 

संबंधित बातम्या