AFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

गोलरक्षक धीरज सिंग मोईरांगथेम याने अफलातून कामगिरी प्रदर्शित करत वाहव्वा मिळविली, आता एएफसीनेही त्याला शाबासकी दिली आहे.

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या एफसी गोवा संघाने लक्षवेधक खेळ केला, त्यात वीस वर्षीय गोलरक्षक धीरज सिंग मोईरांगथेम याने अफलातून कामगिरी प्रदर्शित करत वाहव्वा मिळविली, आता एएफसीनेही त्याला शाबासकी दिली आहे.

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या पूर्व विभाग वगळता सर्व गट साखळी फेरीतील गोलरक्षकांत धीरज सर्वोत्तम ठरला आहे. ``फक्त पाच सामन्यांत स्पर्धेत सर्वाधिक 26 फटके रोखून धीरजने या खंडीय स्पर्धेत पदार्पण करताना नाव कमविले आहे. त्याचे कितीतरी प्रयत्न संस्मरणीय होते, त्यामुळे तज्ज्ञही प्रभावित झाले असून त्यांनी खूप कौतुक केले आहे,`` असे एएफसीने आपल्या संकेतस्थळावर भारताच्या युवा गोलरक्षकाबद्दल नमूद केले आहे. (AFC Champions League AFC congratulates FC Goa for their patience)

AFC Champions League: एफसी गोवाची कामगिरी भूषणावह : क्लिफर्ड

गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ई गट (पश्चिम विभाग) स्पर्धेतील सामने 14 ते 29 एप्रिल या कालावधीत झाले. कोविड-19 महामारीमुळे यावेळेस सामने होम-अवे पद्धतीने न खेळता एकाच ठिकाणी झाले. या गटात एफसी गोवासह इराणचा पर्सेपोलिस एफसी, संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा व कतारचा अल रय्यान या क्लबचा समावेश होता. गटात पर्सेपोलिसने पहिले, तर अल वाहदाने दुसरे स्थान मिळवून आगेकूच राखले. एफसी गोवास तिसरा, तर अल रय्यानला चौथा क्रमांक मिळाला. एफसी गोवाने पाचपैकी तीन सामने बरोबरीत राखले.

स्पर्धेत गोलरक्षकाने अडविलेले फटके

- धीरज सिंग (एफसी गोवा, भारत) : 26

- महंमद अल ओवेस (अल आहली सौदी एफसी, सौदी अरेबिया) : 24

- अहमद बासिल (अल शोर्ता, इराक) : 19

- महंमद रशीद माझाहेरी (एस्तेघलाल एफसी, इराण) : 18

- आदेल अल होसानी (शारजा एफसी, संयुक्त अरब अमिराती) : 17

 

संबंधित बातम्या