AFC Champions League: अल वाहदाने पर्सेपोलिसची विजयी घोडदौड रोखली

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ई गटातील आव्हान संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबने राखले आहे.

पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल (AFC Champions League) स्पर्धेत ई गटातील आव्हान संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबने राखले आहे. त्यांनी सोमवारी रात्री सलग चार सामने जिंकलेल्या इराणच्या गतउपविजेत्या पर्सेपोलिस एफसीला 1-0 फरकाने हरविले. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.  (AFC Champions League Al Wahda thwarts Persepolis winning streak)

AFC Champions League: पर्सेपोलिसविरुद्धच्या पराभवानंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक...

स्लोव्हेनियन खेळाडू टिम माताव्झ याने पाचव्या मिनिटास केलेला गोल अल वाहदा क्लबसाठी निर्णायक ठरला. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. हेन्क टेन काटे यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे पाच लढतीतून 10 गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याह्या गोलमोहम्मदी यांच्या मार्गदर्शनाखालील पर्सेपोलिस संघाला सलग चार विजयानंतर पहिला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे पाच लढतीनंतर 12 गुण व गटातील अव्वल क्रमांक कायम आहे. स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात पर्सेपोलिस संघाने अल वाहदास 1-0 फरकाने हरविले होते.

ई गटातील शेवटची फेरी शुक्रवारी (ता. 29) खेळली जाईल. त्यावेळी पर्सेपोलिस संघासमोर कतारच्या अल रय्यान क्लबचे, तर अल वाहदासमोर भारताच्या एफसी गोवा संघाचे आव्हान असेल.
 

संबंधित बातम्या