AFC Champions League: एफसी गोवास आणखी एक संधी; परतीच्या लढतीत पर्सेपोलिस एफसीचे पारडे जड

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 एप्रिल 2021

ई गटातील परतीच्या लढतीत इराणच्या पर्सेपोलिस संघाचे सलग चौथ्या विजयासाठी पारडे जड असेल, त्याचवेळी एफसी गोवा संघालाही छाप पाडण्याची संधी असेल.

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटातील परतीच्या लढतीत इराणच्या पर्सेपोलिस संघाचे सलग चौथ्या विजयासाठी पारडे जड असेल, त्याचवेळी एफसी गोवा संघालाही छाप पाडण्याची संधी असेल. सामना शुक्रवारी  फातोर्डामधील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

याह्या गोलमोहम्मदी यांच्या मार्गदर्शनाखालील पर्सेपोलिस संघ सलग तीन सामने जिंकून ई गटात नऊ गुणांसह अव्वल स्थानी आहे. पर्सेपोलिस संघाने अल वाहदा (1-0), अल रय्यान (3-1) या संघांना नमविल्यानंतर एका गोलच्या पिछाडीनंतर मागील मंगळवारी एफसी गोवास 2-1 फरकाने नमविले. आशियातील या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रथमच खेळताना एफसी गोवा संघाने लक्षवेधी खेळ केला आहे. अल रय्यान व अल वाहदा क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखून स्पॅनिश हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने दोन गुणांची कमाई केली आहे. (AFC Champions League Another chance for FC Goa Persepolis FCs heavyweights in the return fight)

AFC Champions 2021: एफसी गोवाचे खेळाडू थकलेत - फेरांडो

बेदियाबाबत साशंकता

एफसी गोवास उद्या स्पॅनिश कर्णधार एदू बेदिया याच्या अनुपस्थितीत खेळावे लागू शकले. पर्सेपोलिसविरुद्ध पूर्वार्धात 32 वर्षीय मध्यरक्षकाने गोल केला होता, त्यामुळे एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत गोल नोंदविणारा पहिला भारतीय क्लब हा मान एफसी गोवास मिळाला, मात्र हा अनुभवी खेळाडू शुक्रवारी खेळण्याविषयी फेरांडो यांनी गुरुवारी साशंकता व्यक्त केली.

डावपेचांचे पुनरावलोकन : फेरांडो

``पर्सेपोलिविरुद्धच्या लढतीसाठी आम्हाला डावपेचांचे पुनरावलोकन करायचे आहे. मागील सामन्याच्या तुलनेत आणखी चांगली कामगिरी करण्याची आशा बाळगून आम्ही सामन्यासाठी मैदानात उतरू, मुख्य प्रशिक्षक या नात्याने उत्कृष्ट संघ खेळविणे ही माजी जबाबदारी आहे,`` असे हुआन फेरांडो यांनी उद्याच्या लढतीविषयी सांगितले. सुधारण्यासाठी वाव असला, तरी खेळाडूंच्या कामगिरीवर आपण खूष असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एफसी गोवा कमजोर नाही : गोलमोहम्मदी

``एफसी गोवाविरुद्धच्या मागील सामन्यापूर्वी हा संघ कमजोर असल्याचे प्रत्येकास वाटत होते, पण ते तसे नाहीत. त्यांनी चांगला दर्जा प्रदर्शित केला असून ते सुसंगतपणे उच्च तीव्रतेसह आणि पूर्ण झोकून खेळत आहेत,`` असे पर्सेपोलिस संघाचे प्रशिक्षक याह्या गोलमोहम्मदी यांनी प्रतिस्पर्ध्यांविषयी सांगितले. पर्सेपोलिस संघासाठी कमजोरी ठरू नये यासाठी फ्रीकिक बचावावर जास्त लक्ष केंद्रित केल्याची माहिती गोलमोहम्मदी यांनी दिली. स्पर्धेत स्वीकारलेले दोन्ही गोल सेटपिसेसवर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ई गटातील सर्व संघ मजबूत असल्याने हा गट कदापि कमजोर मानता येता नाही, असेही त्यांनी नमूद केले. पर्सेपोलिस संघ एएफसी चँपियन्स लीगमध्ये केवळ दोन वेळचा उपविजेता आहे.

शुक्रवारचे सामने (ई गट)

- अल रय्यान (कतार) विरुद्ध अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती), रात्री 8 वाजता

- एफसी गोवा (भारत) विरुद्ध पर्सेपोलिस (इराण), रात्री 10.30 वाजता

- दोन्ही सामने फातोर्डा येथील पंडित जवाहलाल नेहरू स्टेडियमवर

दृष्टिक्षेपात...

- पर्सेपोलिस एफसीचे 9, अल वाहदाचे 4, एफसी गोवाचे 2, अल रय्यानचा 1 गुण

- पहिल्या टप्प्यात पर्सेपोलिसची एफसी गोवावर 2-1 फरकाने मात

- पर्सेपोलिस संघाचे गटात सर्वाधिक 6 गोल, एफसी गोवाचा 1 गोल

- पर्सेपोलिस व एफसी गोवाने प्रत्येकी 2 गोल स्वीकारलेत

 

संबंधित बातम्या