AFC Champions League: एफसी गोवासमोर खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

एफसी गोवा संघाला सध्या नियमित खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न सतावत आहे.

पणजी: एफसी गोवा संघाला सध्या नियमित खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न सतावत आहे. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत परतीच्या लढतीत त्यांची कतारच्या अल रय्यान क्लबविरुद्ध लढत होईल, त्यावेळी स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्न असतील. (AFC Champions League FC Goa faces players fitness issues)

स्पर्धेच्या ई गटातील सामना सोमवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. फ्रान्सचे माजी विश्वविजेते खेळाडू लॉरें ब्लांक यांच्या मार्गदर्शनाखालील अल रय्यान क्लबची कामगिरी लौकिकास साजेशी झालेली नाही. कतारमधील माजी लीग विजेत्या संघाला चारपैकी तीन लढतीत पराभव पत्करावा लागला असून त्यांच्या खाती फक्त एक गुण आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना एफसी गोवाने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने बरोबरीत राखून उल्लेखनीय ठरलेल्या एफसी गोवास इराणच्या पर्सेपोलिसविरुद्धच्या दोन्ही लढतीत  सूर गवसला नाही. त्यांना अनुक्रमे 1-2 व 0-4 फरकाने पराभव पत्करावा लागला.

AFC Champions League: पर्सेपोलिसविरुद्धच्या पराभवानंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक...

``संघातील बरेच खेळाडू दमलेत. त्यामुळे संघात खूप बदल करणे भाग पडले,`` असे पर्सेपोलिसविरुद्धच्या लढतीनंतर एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी सांगितले होते. गेल्या शुक्रवारी रात्री झालेल्या लढतीत एफसी गोवाने सुरवातीच्या अकरा सदस्यीय संघात पाच बदल केले होते. सोमवारच्या लढतीसाठी कर्णधार स्पॅनिश एदू बेदिया निवडीसाठी उपलब्ध असेल, तसेच लक्षवेधक ठरलेला गोलरक्षक धीरज सिंगही खेळण्याचे संकेत आहेत. पर्सेपोलिसविरुद्धच्या सामन्यात एफसी गोवाने बचाव, चेंडूवरील नियंत्रण आदींत कित्येक चुका केल्याचे फेरांडो यांनी मान्य केले होते.

खेळाडू वीस दिवसांच्या कालावधीनंतर दुखापतग्रस्त असून थकले आहेत, तरीही पुढील दोन्ही लढतीत नियोजनबद्ध खेळ करून उत्कृष्ट कामगिरी नोंदविण्यावर भर असल्याचे फेरांडो यांनी नमूद केले. ``हा सामना महत्त्वाचा आहे हे अल रय्यानला माहीत आहे, त्यांच्या संघात काही नवे खेळाडू असतील, त्यामुळे सामना पूर्णतः वेगळा असेल, तरीही  सकारात्मक निकालासाठी आम्ही मेहनत घेऊ,`` अशी आशा फेरांडो यांनी व्यक्त केली.

अल रय्यान क्लबला ओळीने तीन सामने गमवावे लागले आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबने त्यांना दोन वेळा पराजित केले आहे. पहिल्या टप्प्यात दोन गोलांची आघाडी घेऊनही अल रय्यान क्लब पराजित झाला. अल वाहदाविरुद्धच्या मागील लढतीत त्यांच्या दोघा खेळाडूंना रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे हा संघ सोमवारी एफसी गोवाविरुद्ध अहमद अल सय्यद व फ्रांक कोम यांच्याविना मैदानात उतरेल. दहाव्यांदा एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळूनही अल रय्यानला पुढील फेरी गाठण्यात अपयश आले आहे.

``आम्ही अपेक्षेनुसार खेळ केलेला नसला, तरी विजय नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न असतील. एफसी गोवा संघटित चमू असल्याने त्यांच्याविरुद्धचा सामना कठीण असेल. आमचे दोघे खेळाडू निलंबित आहेत आणि काहीजण दुखापतग्रस्त. मला वाटतं, एफसी गोवासही दुखापतीच्या समस्या आहेत. मागील लढतीत आम्ही संधीचा लाभ उठवू शकलो नाही आणि खेळाडूंपाशी थोडा जास्त अनुभव असता, तर सध्या आमचे सात किंवा आठ गुण असते. आता स्पर्धा सकारात्मक पद्धतीने संपविणे महत्त्वाचे आहे,`` असे ब्लांक म्हणाले.   .

पर्सेपोलिस संघाला संधी

सलग चार विजयांसह १२ गुण नोंदवून ई गटात अव्वल स्थानी असलेला इराणचा पर्सेपोलिस संघ `राऊंड ऑफ १६`च्या उंबरठ्यावर आहे. सोमवारी अल वाहदा क्लबला नमवून सलग पाचव्या विजयाची नोंद केल्यास याह्या गोलमोहम्मदी यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची मोहीम फत्ते होईल. अल वाहदा क्लबचे दोन विजयांसह सात गुण आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांना पर्सेपोलिस संघाने एका गोलने हरविले होते.

दृष्टिक्षेपात...

- मागील लढतीत पर्सेपोलिस संघाचा एफसी गोवावर 4-0 फरकाने विजय

- 9 खेळाडूंसह खेळत अल रय्यान क्लब अल वाहदा संघाविरुद्ध 0-1 फरकाने पराभूत

- एफसी गोवाचे 2, तर अल रय्यान क्लबचा 1 गुण

- पहिल्या टप्प्यात14 एप्रिल रोजी उभय संघाल 0-0 बरोबरी

- एफसी गोवाचा स्पर्धेत 1, तर अल रय्यानचे 3 गोल

- एफसी गोवाने 6, तर अल रय्यानने 7 गोल स्वीकारलेत

 

सोमवारचे `ई` गट सामने

- अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती) विरुद्ध पर्सेपोलिस (इराण), रात्री 8 वाजता

- अल रय्यान (कतार) विरुद्ध एफसी गोवा (भारत), रात्री 10.30 वाजता

- दोन्ही सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर
 

संबंधित बातम्या