AFC Champions League: ऐतिहासिक कामगिरीसाठी एफसी गोवा सज्ज

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करताना एफसी गोवा संघ ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज झाला आहे.

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करताना एफसी गोवा संघ ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. ई गटात कतारच्या अल रय्यान स्पोर्टस क्लबविरुद्ध गोव्याचा संघ बुधवारी (ता. 14) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियवर खेळेल. एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय संघ हा मान एफसी गोवास मिळाला आहे. 2019-20 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड पटकावून त्यांनी ही पात्रता मिळविली आहे. कतारमधील स्टार्स लीगमध्ये अल रय्यान संघाने 2019-20 मोसमात उपविजेतेपद मिळवून चँपियन्स लीगसाठी पात्रता मिळविली आहे. फ्रान्सचे दिग्गज फुटबॉलपटू लॉरें ब्लांक या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

चँपियन्स लीग स्पर्धेसाठी एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी संघातील सहा परदेशी खेळाडूंपैकी बचावपटू इव्हान गोन्झालेझ, मध्यरक्षक कर्णधार एदू बेदिया व होर्गे ओर्तिझ या स्पॅनिश खेळाडूंसह ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाकी याची निवड केली आहे. स्पर्धेचा नियम आड आल्यामुळे यंदाच्या आयएसएल स्पर्धेत 14 गोलसह गोल्डन बुट पटकाविलेला इगोर आंगुलो व आठ असिस्ट नोंदवलेला आल्बर्टो नोगेरा यांना संघात स्थान मिळू शकले नाही. (AFC Champions League FC Goa ready for historic performance)

AFC champions league 2021: एफसी गोवा संघात मोठे बदल

अतिशय महत्त्वाचा क्षण : फेरांडो

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतील पहिला सामना आपला क्लब आणि भारतीय फुटबॉलसाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रतिस्पर्धी आणि त्यांच्या फुटबॉलचा दर्जा लक्षात घेत आपल्या संघाने खूप मेहनत घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. ``अल रय्यानविरुद्धचा सामना अतिशय तीव्र असेल आणि खेळाडूंच्या मानसिकतेइतकीच शारीरिक क्षमताही महत्त्वाची असेल. प्रत्येक सामन्यात एकाग्रतेचा दर्जा राखणे अतिशय गरजेचे असेल,`` असे फेरांडो म्हणाले.

अल रय्यान संघ तयार : ब्लांक

``एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यासाठी माझ्या संघाने पूर्ण तयारी केली असून सज्ज आहे. या ठिकाणी मी प्रथमच येत असून स्टेडियमवरही पहिल्यांदाच खेळणार आहोत. आम्ही सर्वोत्तम कामगिरी प्रदर्शित करू,`` असे अल रय्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक लॉरें ब्लांक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ``या स्पर्धेत माझ्या संघाने सर्वोत्कृष्ट खेळ करावा ही मनीषा आहे. सामन्यांमधील विश्रांतीचे दिवस लक्षात घेता मोसम खूपच खडतर असेल. आम्ही आमचे लक्ष्य आणि ध्येय निश्चित केले आहे, पण सध्या एफसी गोवावर नजर एकवटली आहे आणि त्यांना नमविणे सोपे नसेल,`` असे फ्रान्सच्या माजी विश्वविजेत्या संघातील खेळाडूने सांगितले.

बुधवारचे सामने (ई गट)...

- पर्सेपोलिस एफसी (इराण) विरुद्ध अल वाहदा (यूएई) – रात्री 8 वाजता

- एफसी गोवा (भारत) विरुद्ध अल रय्यान (कतार) – रात्री 10.30 वाजता

- दोन्ही सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर
 

संबंधित बातम्या