AFC Champions League: एफसी गोवाची कामगिरी भूषणावह : क्लिफर्ड

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबविरुद्ध खेळताना एफसी गोवाने धाडस प्रदर्शित केले.

पणजी : मुख्य प्रशिक्षक, संघातील प्रमुख परदेशी खेळाडू यांच्या अनुपस्थितीत आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल (AFC Champions League) स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबविरुद्ध खेळताना एफसी गोवाने धाडस प्रदर्शित केले, या कारणास्तव खेळाडूंची कामगिरी भूषणावह आहे, असे मत संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी व्यक्त केले. (AFC Champions League FC Goas performance admirable Clifford)

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी रात्री अल वाहदा क्लबकडून एफसी गोवास 2-0 फरकाने हार पत्करावी लागली. या कामगिरीने ई गटातील सर्वोत्तम उपविजेता संघ या नात्याने अल वाहदा क्लबनेही इराणच्या पर्सेपोलिस संघासह स्पर्धेच्या राऊंड ऑफ 16 फेरीत प्रवेश केला. पर्सेपोलिसचे 15, तर अल वाहदाचे 13 गुण झाले. भारतातील कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांकडून आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आहेत, त्या कारणास्तव एक सामना बाकी असताना मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो, तंदुरुस्ती प्रशिक्षक हावी गोन्झालेझ, खेळाडू एदू बेदिया, इव्हान गोन्झालेझ, होर्गे ओर्तिझ हे स्पॅनिश, तर ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाकी रवाना झाल्यामुळे एफसी गोवास त्यांच्याविना अल वाहदा क्लबविरुद्धच्या सामन्यात खेळावे लागले.

AFC Champions League: कोरोनामुळे एफसी गोवाचे परदेशी खेळाडू तातडीने मायदेशी रवाना

फेरांडो यांच्या अनुपस्थितीत क्लिफर्ड यांनी एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. ``अशा परिस्थितीत खेळणे नेहमीच कठीण असते. खेळाडूंनी सामन्यात बजावलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. आशियातील एका उत्कृष्ट संघाविरुद्ध आम्ही खेळलो आणि जरी आम्ही पराभूत झालो, तरी खेळाडूंनी विलक्षण कामगिरी प्रदर्शित केली,`` असे क्लिफर्ड म्हणाले. ``हुआन (फेरांडो) यांनी नियोजन आखून दिले होते, त्यानुसार आम्ही कितीतरी वेळा सराव सत्र घेतले आहे, माझे काम नियोजन प्रत्यक्षात आणण्याचे होते. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत खेळणे अवघड ठरले नाही,`` असे क्लिफर्ड यांनी नमूद केले. ``एफसी गोवा एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्र ठरला, तेव्हा कोणीही हा संघ गटात तिसरा क्रमांक मिळवेल याची अपेक्षा बाळगली नव्हती. आता लोकांनी आमची दखल घेतली याचे खूप समाधान आहे, याचे सारे श्रेय खेळाडूंना जाते, त्यांनी शानदार काम केले,`` असे क्लिफर्ड यांनी पुन्हा एकदा खेळाडूंची पाठ थोपटताना सांगितले.

एफसी गोवाची कामगिरी

- 6 सामन्यांत 3 बरोबरी, 3 पराभव, 2 गोल नोंदविले, 9 गोल स्वीकारले, 3 गुण, ई गटात तिसरा क्रमांक

- एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत गुण प्राप्त करणारा पहिला भारतीय फुटबॉल क्लब, अल रय्यानविरुद्ध 0-0 बरोबरी

- इराणच्या पर्सेपोलिस संघाविरुद्ध एफसी गोवाच्या एदू बेदियाचा 14व्या मिनिटास गोल

- एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत भारतीय क्लबतर्फे पहिला गोल

- गोलरक्षक धीरज सिंगकडून सलग 2 सामने क्लीन शीट

संबंधित बातम्या