AFC Champions League: एफसी गोवासाठी प्रतिष्ठेची लढत; अल वाहदा क्लबचे खडतर आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

पुढील फेरी गाठण्याची संधी असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबचे त्यांच्यासमोर खडतर आव्हान असेल.

पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण केलेल्या भारताच्या एफसी गोवाचे आव्हान ई गट साखळीतच संपले आहे, मात्र अखेरच्या लढतीत ते प्रतिष्ठेसाठी मैदानावर उतरतील. पुढील फेरी गाठण्याची संधी असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबचे त्यांच्यासमोर खडतर आव्हान असेल.

एफसी गोवा आणि अल वाहदा यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी रात्री 10.30 वाजता खेळला जाईल, त्यापूर्वी इराणचा गतउपविजेता पर्सेपोलिस आणि कतारचा अल रय्यान क्लब यांच्यात आठ वाजता लढत होईल. एफसी गोवा आणि अल रय्यान क्लबचे आव्हान गटसाखळीत आटोपले आहे, मात्र पर्सेपोलिस व अल वाहदा क्लबचे आव्हान कायम आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ अखेरच्या साखळी लढतीत विजयासाठी प्रयत्नशील असतील. (AFC Champions League Fight for prestige for FC Goa Al Wahda Clubs tough challenge)

AFC Champions League: एफसी गोवाचा विक्रमी विजय हुकला

स्पर्धेत चार सामने जिंकलेल्या पर्सेपोलिस संघाचे सर्वाधिक 12 गुण आहेत. गुरुवारी त्यांनी अल रय्यान क्लबला हरविल्यास 15 गुणांसह इराणचा लीग विजेता संघ राऊंड ऑफ 16 फेरीत दाखल होईल. अल वाहदा क्लबचे सध्या तीन विजयासह 10 गुण आहेत. त्यांनी एफसी गोवास नमविले, तर त्यांचे 13 गुण होतील आणि गटातील सर्वोत्तम उपविजेता संघ या नात्याने त्यांनाही राऊंड ऑफ 16 फेरीची संधी राहील. अल रय्यान क्लबने पर्सेपोलिस संघाला चकीत केले आणि अल वाहदाने एफसी गोवास हरविल्यास अबुधाबी येथील संघ गटात अव्वल ठरेल आणि त्यांची पुढील फेरी निश्चित होईल. एफसी गोवा (3 गुण) आणि अल रय्यान क्लब (2 गुण) यांना पुढील फेरीची अजिबात संधी नाही.

स्पॅनिश हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने पहिल्या टप्प्यात अल वाहदा क्लबला गोलशून्य बरोबरी रोखून शाबासकी मिळविली होती.  त्या लढतीनंतर नेदरलँडर्सचे हेन्क टेन काटे यांच्या मार्गदर्शनाखालील अल वाहदा क्लबने प्रगती साधली, मागील लढतीत त्यांनी अव्वल स्थानावरील पर्सेपोलिस संघाला एका गोलने हरविले. एफसी गोवास अल रय्यान क्लबविरुद्ध यापूर्वीच्या लढतीत इतिहास रचण्याची संधी होती. तिसऱ्या मिनिटास होर्गे ओर्तिझ याने नोंदविलेल्या गोलमुळे गोव्यातील संघ स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या दिशेने कूच करत होता, पण 89व्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे त्यांना अल रय्यानविरुद्ध बरोबरीचा एक गुण विभागून घ्यावा लागला. गुरुवारी एफसी गोवाने अल वाहदास नमविण्याचा महापराक्रम साध्य केल्यास स्पर्धेत विजय नोंदविणारा पहिला भारतीय संघ हा मान गोमंतकीय क्लबला मिळेल.

AFC Champions League: अल वाहदाने पर्सेपोलिसची विजयी घोडदौड रोखली

``जोरदार टक्कर देत तीन गुण प्राप्त करणे हेच आमचे मुख्य नियोजन आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीची प्रक्रिया पाहता हे काम सोपे नसेल, पण आम्हाला एकाग्रता कायम ठेवून कामगिरी करावी लागेल,`` असे फेरांडो सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले. संघातील खेळाडूंचे कौतुक करताना फेरांडो यांनी सांगितले, की ``दबाव व्यवस्थापनात हे खेळाडू मानसिकदृष्ट्या कणखर आहेत. माझे खेळाडू आत्मविश्वास गमावताना दिसत नाहीत, त्यामुळेच मागील लढतीप्रमाणेच उद्याच्या सामन्यातील लक्ष्यही कायम आहे.`

एफसी गोवाविरुद्ध खेळताना अल वाहदा क्लबला पर्सेपोलिस व अल रय्यान यांच्यातील सामन्याचा निकाल माहीत असेल. ``एफसी गोवास जिंकण्याची संधी देता येणार नाही. आम्हाला पुढील फेरीसाठी पात्रता मिळवायची आहे. आम्ही या ठिकाणी हेच ध्येय बाळगून आलो आहोत आणि विश्वास वाटतो की त्यात यशस्वी ठरू,`` असे अल वाहदा क्लबचे प्रशिक्षक टेन काटे यांनी सांगितले. निलंबनामुळे त्यांना नियमित कर्णधार ईस्माईल मतार याला मुकावे लागेल.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवा व अल वाहदा यांच्यात पहिल्या टप्प्यात 0-0 बरोबरी

- स्पर्धेत अल वाहदाचे 5, तर एफसी गोवाचे 2 गोल

- अल वाहदाने 3, तर एफसी गोवाने 7 गोल स्वीकारलेत

- सध्या पर्सेपोलिस व अल वाहदा यांच्यात 2 गुणांचा फरक

- पर्सेपोलिस संघाचे 4 विजय, 1 पराभव, 12 गुण

- अल वाहदाचे 3 विजय, 1 बरोबरी, 1 पराभव, 10 गुण

- एफसी गोवाच्या 3 बरोबरी, 2 पराभव, 3 गुण

- अल रय्यान क्लबच्या 2 बरोबरी, 3 पराभव, 2 गुण

संबंधित बातम्या