AFC Champions League: धडाकेबाज विजयासह पर्सेपोलिसची आगेकूच

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

कतारच्या अल रय्यान क्लबवर 4-2 असा धडाकेबाज विजय नोंदविला.

पणजी: इराणच्या पर्सेपोलिस एफसीने आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल (AFC Champions League) स्पर्धेत आगेकूच राखताना गुरुवारी कतारच्या अल रय्यान क्लबवर 4-2 असा धडाकेबाज विजय नोंदविला, त्यासह ई गटात अव्वल स्थान राखत त्यांनी राऊंड ऑफ 16 फेरीतही प्रवेश केला.(AFC Champions League Persepolis advance with a resounding victory)

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या पूर्वार्धात पर्सेपोलिस संघ 2-0 फरकाने आघाडीवर होता. त्यांच्यासाठी शाहरियार मोघानलौ याने 27व्या, तर एहसान पहलेवान याने 33व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात होसेन कनानी याने 68व्या आणि इसा अलकासीर याने 73व्या मिनिटास गोल नोंदवून स्पर्धेतील गतउपविजेत्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अल रय्यान क्लबतर्फे खिंड लढविताना आयव्हरियन आघाडीपटू योहान बोली याने दोन्ही गोल केले. त्याने अनुक्रमे 48 व 72व्या मिनिटास अचूक नेमबाजी साधली.

AFC Champions League: एफसी गोवासाठी प्रतिष्ठेची लढत; अल वाहदा क्लबचे खडतर आव्हान

याह्या गोलमोहम्मदी यांच्या मार्गदर्शनाखालील पर्सेपोलिस संघाचा हा सहा लढतीतील पाचवा विजय ठरला. 15 गुणांसह त्यांनी ई गटात अव्वल स्थान राखले. त्यांनी स्पर्धेत फक्त एक सामना गमावला. फ्रान्सचे माजी विश्वविजेते खेळाडू लॉरें ब्लांक यांच्या मार्गदर्शनाखालील अल रय्यान क्लबला सहा लढतीत चौथा पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील दोन बरोबरीमुळे अवघ्या दोन गुणांसह ते तळाच्या चौथ्या स्थानी राहिले. 

 

संबंधित बातम्या