गोमंतकिय क्रिकेटमध्ये सहकाऱ्यांना 'भावा' म्हणून हाक मारणारे जेरी फर्नांडिस

Jerry Fernandes
Jerry Fernandes

पणजी: मैदानावर आपल्या सहकाऱ्यांना हाक मारताना ‘भावा’ असे संबोधन करणारे जेरी फर्नांडिस(Jerry Fernandes) यांनी गोमंतकीय क्रिकेटमध्ये(Goa Cricket) आगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनाने आता ती आर्त हाक कधीच ऐकायला मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया गोव्याचे माजी रणजी संघ कर्णधार प्रशांत काकोडे यांनी व्यक्त केली.(After coming to Goa Jerry Fernandes made it to the Ranji Trophy)

जेरी (वय 57) यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर काकोडे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. चौगुले स्पोर्टस क्लबतर्फे काकोडे व जेरी एकत्रित खेळले होते. निवृत्तीनंतर ते राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये जास्त सक्रिय नव्हते, मात्र काही वर्षांपूर्वी व्हेटरन क्रिकेटच्या निमित्ताने ते संपर्कात होते. त्यानंतर ते मैदानावर फारच क्वचित दिसले.  कारकिर्दीच्या सुरवातीस ते डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी टाकत असत, नंतर त्यांनी डावखुऱ्या फिरकी शैलीवर भर दिला, असे काकोडे यांनी नमूद केले.

पणजी जिमखाना संघातर्फे खेळत असताना जेरी हे गोव्याचे अष्टपैलू रणजीपटू सुदिन कामत यांचे नव्या चेंडूचे साथीदार होते. प्रतिस्पर्धी फलंदाजास गोलंदाजी टाकताना ते सहकाऱ्यास नेहमीच ‘घे मुरे तेका...’ असे आरोळी ठोकत उत्तेजन देत असत, असे सुदिन यांनी आपल्या माजी सहकाऱ्याविषयी सांगितले. त्यांच्या सोबत नव्या चेंडूने गोलंदाजी टाकण्याचा अनुभव आगळाच होता, असे सुदिन म्हणाले.

पुणे ते गोवा...
पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात शिकत असताना जेरी यांचे क्रिकेट बहरले. त्यानंतर तेथील स्थानिक क्रिकेटमध्ये ते अष्टपैलू या नात्याने चमकले. महाराष्ट्राचे त्यांनी 19 व 22 वर्षांखालील वयोगट पातळीवर प्रतिनिधित्व केले. याशिवाय पुणे विद्यापीठातर्फे ते खेळले. नोकरीनिमित्त गोव्यात आल्यानंतर येथील स्थानिक क्रिकेटमध्ये रूळले आणि रणजी स्पर्धेपर्यंत मजल मारली. ते डावखुरे फलंदाज होते, डावखुरे मध्यमगती गोलंदाज असलेले जेरी वेळप्रसंगी डावखुरी फिरकी गोलंदाजीही टाकत असत. राज्य पातळीवरील स्पर्धांत त्यांनी पणजी जिमखाना व चौगुले स्पोर्टस क्लबचे प्रतिनिधित्व केले.

अनैसर्गिक मृत्यू नोंद 

पर्वरी येथील तीन बिल्डिंगजवळील त्रिलोक दर्शन या वसाहतीत राहणाऱ्या जेरी यांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात मृत्यू झाला. या संबंधीचे पोलिसांनी दिलेले सविस्तर वृत्त असे, की जेरी गुरुवारी राहत्या घरी बेशुद्धावस्थेत सापडले. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते जमिनीवर पडले होते, लगेच पोलिसांनी त्यांना गोमेकॉत दाखल केले असता डॉक्टरनी मृत घोषित केले.ते आजारी होते व त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरु होते. जेरी महाराष्ट्र बँकेच्या पर्वरी शाखेत अधिकारीपदी कार्यरत होते. ते पर्वरी येथील सदनिकेत एकटेच राहत होते. त्यांच्या मागे पत्नी व मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली असून निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर पुढील तपास करीत आहेत.

दृष्टिक्षेपात कारकीर्द

  • कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर
  • कर्नाटकविरुद्ध रणजी क्रिकेट पदार्पण, 26  ते 28 नोव्हेंबर 1988
  • कर्नाटकचे तत्कालीन कर्णधार रॉजर बिन्नीच्या रूपात रणजी क्रिकेटमध्ये पहिली विकेट
  • कारकिर्दीत शेवटचा रणजी सामना केरळविरुद्ध कोझिकोड येथे, 10 ते 13 डिसेंबर 1994
  • शेवटच्या डावात 107 धावांत 3 बळी, कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी
  • एकंदरीत 9 रणजी क्रिकेट सामन्यांत 16 विकेट, एका अर्धशतकासह 162 धावा, 70 वैयक्तिक सर्वोच्च
  • प्रथम श्रेणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 सामने, 6 विकेट, 40 धावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com