IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सनंतर आता धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का  

दैनिक गोमन्तक
शनिवार, 3 एप्रिल 2021

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा चौदावा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा चौदावा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. अशा वेळी आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघाना मोठा झटका लागल्याची माहिती मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टाफ मेंबर हे कोरोना संसर्गग्रस्त आढळले आहेत. कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर अक्षर पटेल 28 मार्च रोजी संघात सामील झाला होता. परंतु, दुसऱ्या कोरोना चाचणीत त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे. (After the Delhi Capitals now one of the Chennai Super Kings team has a corona infection)

अक्षर पटेलचा दुसरा कोरोना अहवाल सकारात्मक आढळल्यानंतर सध्याच्या घडीला त्याला वैद्यकीय देखरेखीखाली क्वारंटाईन करण्यात आल्याचे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्स संघातील एका स्टाफ मेंबरचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असल्याचे समजते. स्टाफ मधील या मेंबरला देखील क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती चेन्नई सुपर किंग्स संघाने दिली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी याबाबतची पुष्टी करताना, पॉझिटिव्ह आलेला संघातील कर्मचारी हा खेळाडूच्या अथवा इतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला नसल्याचे सांगितले. शिवाय, या स्टाफ मेंबरची कोरोना चाचणी सकारात्मक येण्यापूर्वी सुद्धा तो इतर कोणाशीच संपर्कात आला नसल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. 

पीटरसनच्या ‘त्या’ ट्विटला पाकिस्तानी चाहत्यांच्या भडक प्रतिक्रीया 

याव्यतिरिक्त, मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियम मधील काही ग्राउंड वर्कर्स यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अधिकाऱ्यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावत, कोणत्याच व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारत्मक आला नसल्याचे म्हटले आहे. मुंबईत यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिले काही सामने अन्यत्र ठिकाणी खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारली नाही.    

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आज दिवसभरात 49,447 कोरोनाबाधित वाढले असून 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.88 टक्के आहे. तर, राज्यात आत्तापर्यंत 55,655 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,01,172 झाली आहे. याशिवाय, दिवसभरामध्ये 37,821 रुग्ण ठिक देखील झाले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 24,95,315 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.49 एवढे झाले आहे.  

संबंधित बातम्या