भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट ‘हाऊसफुल्ल’

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

 कोरोना महामारीच्या संकटात क्रिकेट सुरू करण्याचे शिवधनुष्य पेलले गेले आहे, आता मर्यादित स्वरूपात असले तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीचा श्रीगणेशा भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेतून केला जाणार आहे.

सिडनी :  कोरोना महामारीच्या संकटात क्रिकेट सुरू करण्याचे शिवधनुष्य पेलले गेले आहे, आता मर्यादित स्वरूपात असले तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीचा श्रीगणेशा भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेतून केला जाणार आहे. पहिल्या दिवशी सहापैकी पाच सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली.

पुढच्या शुक्रवारपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा थरार सुरू होत आहे. तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेन्टी-२० मालिका असा सुरुवातीचा कार्यक्रम आहे, यातील पहिला एकदिवसीय सामन्याचा अपवाद वगळता पुढचे दोन एकदिवसीय आणि तिन्ही ट्‌वेन्टी-२० सामन्यांची तिकिटे विक्रीस उपलब्ध होताच काहीच तासांत संपली. पहिल्या सामन्याचीही काहीच तिकिटे शिल्लक आहेत, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच दिली आहे. 

पुढच्या शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याची सुमारे १,९०० तिकिटेच शिल्लक राहिली आहेत. सिडनी आणि मनुका ओव्हल या स्टेडियम क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहाण्याची परवानगी देण्यात आली आहे. गतवेळच्या तुलनेत यावेळी तिकिटांची किंमत काहीशी कमी करण्यात आली आहे.

देशातील क्रिकेटवेड्या प्रेक्षकांनाही कधी एकदा देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होतेय याची उत्सुकता लागलेली आहे. म्हणूनच तिकीट विक्रीस सुरुवात होताच प्रेक्षकांनी त्यावर उड्या मारल्या, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी सरव्यवस्थापक अँथनी एव्हर्ड यांनी सांगितले. सध्याच्या क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट द्वंद सर्वश्रेष्ठ मानले जात आहे, असेही एव्हर्ड म्हणाले. 

ऑस्ट्रेलियात बीग बॅशचाही थरार

पुढील आठवड्यापासून ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमींना उच्चदर्जाचे क्रिकेट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काही तासांतच तिकिटे संपली याचे आम्हाला आश्‍चर्य वाटले नाही. एकदिवसीय असो वा ट्‌वेन्टी-२० सर्व सामने चुरशीचे होतील, असाही विश्‍वास अँथनी एव्हर्ड व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय मालिकेसोबत ऑस्ट्रेलियात बीग बॅश लीगही होत आहे.

संबंधित बातम्या