सात क्रमांकाची जर्सीही निवृत्त करा: कार्तिक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (१० क्रमांकाची जर्सी), फुटबॉलमध्ये दिएगो मॅराडोना, लिओनेल मेस्सी (१०) ख्रिस्तियानो रोनाल्डो (७) यांनी त्यांच्या या क्रमांकाची जर्सी अजरामर केली आहे. तसेच धोनी आणि सात क्रमांकाची जर्सी हे समीकरण झालेले आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्‍वात आपल्या कर्तृत्वाचा बहुमोल ठसा उमटवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट भावनावश झाले आहे. वाढदिवसाची सात तारीख आणि तोच क्रमांक धोनीची मोठी ओळख होती. आता हा क्रमांकही रिटायर्ड करा, अशी मागणी धोनीचा साथीदार दिनेश कार्तिकने केली आहे.

क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (१० क्रमांकाची जर्सी), फुटबॉलमध्ये दिएगो मॅराडोना, लिओनेल मेस्सी (१०) ख्रिस्तियानो रोनाल्डो (७) यांनी त्यांच्या या क्रमांकाची जर्सी अजरामर केली आहे. तसेच धोनी आणि सात क्रमांकाची जर्सी हे समीकरण झालेले आहे. हाच मुद्दा पकडून कार्तिकने धोनीची सात क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची मागणी करताना धोनीबरोबरचा विश्‍वकरंडक उपांत्य सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे.

कार्तिकच्या मागणीला बीसीसीआयच्या अपेक्‍स कौन्सिलमधील सदस्या आणि माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी यांनीही पाठिंबा दर्शवला. हा सन्मान धोनीला मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले. 

नियम काय म्हणतो
बीसीसीआय असो, आयसीसी असो, जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा असा कोणताही नियम नाही. धोनीची जर्सी निवृत्त केली, तर आमची काहीच हरकत नसेल, हा प्रत्येक संघटनांचा निर्णय आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. सचिन तेंडुलकर २०१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्याची १० क्रमांकाचीही जर्सी निवृत्त झाली होती; पण मुंबईचाच खेळाडू शार्दुल ठाकूरने श्रीलंका दौऱ्यातील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात १० क्रमांकाची जर्सी वापरली त्या वेळी सोशल मीडियातून त्याच्यावर जबरदस्त टीका करण्यात आली. अखेर त्याने जर्सी क्रमांक बदलला.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या