आयएसएलमध्ये मयेचा अमय खेळणार बंगळूर संघाकडून

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

भटवाडी-मये येथील युवा गोमंतकीय मध्यरक्षक अमय अविनाश मोरजकर याची आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी बंगळूर एफसी संघात निवड झाली आहे

पणजी  : भटवाडी-मये येथील युवा गोमंतकीय मध्यरक्षक अमय अविनाश मोरजकर याची आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी बंगळूर एफसी संघात निवड झाली आहे.

अमय २० वर्षांचा आहे. डेव्हलपमेंट चमूअंतर्गत त्याला माजी आयएसएल विजेत्या बंगळूर एफसी संघात स्थान मिळाले आहे. एआयएफएफ एलिट अकादमीतून २०१६ साली तो बंगळूर एफसी अकादमीत दाखल झाला. बंगळूर सुपर डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेत बंगळूर एफसीच्या राखीव संघाने २०१८-१९ व २०१९-२० मोसमात विजेतेपद मिळविले, दोन्ही वेळेस अमयने विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केले. संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत तो कर्नाटककडूनही खेळला आहे. 

कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर एफसी संघ २०२० मधील एएफसी कप स्पर्धेत खेळला. पात्रता फेरीतील लढतीसाठी अमयची बंगळूरच्या तीस सदस्यीय संघात निवड झाली होती. भूतानच्या पारो एफसी संघाविरुद्ध त्याने बंगळूर एफसीतर्फे व्यावसायिक फुटबॉल पदार्पण केले. बंगळूर एफसीच्या राखीव संघातून तो द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेतही खेळला आहे. 
आयएसएल स्पर्धेचा २०२०-२१ मोसम गोव्यातील रिकाम्या स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात येत्या २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. बंगळूर एफसीचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला फातोर्डा येथे एफसी गोवा संघाविरुद्ध होईल.

संबंधित बातम्या