गोव्याच्या अमेयला आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळात ब्राँझ

Dainik Gomantak
गुरुवार, 18 जून 2020

भारतीय वेळेनुसार दररोजी संध्याकाळी सात वाजता स्पर्धेला सुरवात होत असे. या स्पर्धेत १७ देशांतील ५२ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता, त्यापैकी १० खेळाडू किताब धारक होते.

पणजी

गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी याने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझपदक जिंकण्याचा पराक्रम साधला.

ग्रीस बुद्धिबळ महासंघाने ५ ते १३ जून या कालावधीत घेतलेल्या पहिल्या ऑनलाईन हेर्सोनिसोस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. भारतीय वेळेनुसार दररोजी संध्याकाळी सात वाजता स्पर्धेला सुरवात होत असे. या स्पर्धेत १७ देशांतील ५२ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता, त्यापैकी १० खेळाडू किताब धारक होते.

स्टॅण्डर्ड प्रकारात मेयने नऊ फेऱ्यांत पाच विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह साडेसहा गुणांची कमाई केली. त्याला सर्वसाधारण क्रमवारीत चौथा क्रमांक मिळाला. त्यामुळे तो नऊ फेऱ्यांच्या बाद पद्धतीच्या ब्लिट्झ फेरीसाठी पात्र ठरला. ब्लिट्झमध्ये अमेयने पहिल्या फेरीत भारतीय आयएम खेळाडू सीआरजी कृष्णा याला हरविले. उपांत्य फेरीत आरव डेंगला याच्याविरुद्धचा त्याचा डाव बरोबरीत राहिला. त्यात नियमानुसार आरवला अंतिम फेरीत प्रवेश करता आला, तर अमेयला ब्राँझपदकासाठी खेळावे लागेल. या लढतीत अमेयने इटलीच्या जिओव्हानी मार्चेसिच याला हरवून पदकाची कमाई केली.

अमेयने यावर्षी फेब्रुवारीत मॉस्कोतील एरोफ्लोट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आयएम किताबासाठी आवश्यक तिसरा नॉर्म प्राप्त केला होता. या स्पर्धेत त्याल ब गटात दहावा क्रमांक मिळाला होता व तो भारतीय खेळाडूंत उत्कृष्ट ठरला होता. तो राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटातील माजी रौप्यपदक विजेता आहे. अमेयने आयएम किताबाचा पहिला नॉर्म ऑक्टोबर २०१९ मध्ये जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत मिळविला होता. दुसरा नॉर्म त्याने या वर्षी प्रारंभी दिल्लीतील खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत मिळविला होता. गतवर्षी त्याने सर्बियात सेंटा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती.

 देवाचे आभार...

जगभरात कोविड-१९चा उद्रेक होण्यापूर्वीच अमेय अवदीच्या इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे तिन्ही नॉर्म पूर्ण झाले, तसेच त्याने २४०० एलो गुणांचाही टप्पा गाठला होता. महामारी फैलावण्यापूर्वीच आयएम किताबाचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल या प्रतिभाशाली बुद्धिबळपटूने देवाचे आभार मानले आहे. सध्या कोरोना विषाणू महामारीमुळे जगभरात प्रवासावर निर्बंध आहेत, मात्र बुद्धिबळात ऑनलाईन स्पर्धा जोमाने सुरू आहेत.

संबंधित बातम्या