अमेयच्या आयएम किताबावर फिडेचे शिक्कामोर्तब

Dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

अमेय २१ वर्षांचा असून जीनो फार्मास्युटिकल्सचा सदिच्छा दूत आहे. अमेयने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात लाजवाब खेळ प्रदर्शित करताना नाव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयएम किताबासाठी आवश्यक तीन नॉर्म प्राप्त केले, तसेच २४०० एलो रेटिंगचाही टप्पा गाठला.

पणजी 

गोव्याचा प्रतिभावान बुद्धिबळपटू अमेय अवदी याच्या इंटरनॅशनल मास्टर (आयएम) किताबावर जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) शिक्कामोर्तब केले आहे. जुलैच्या प्रारंभी झालेल्या दुसऱ्या तिमाहीतील ऑनलाईन अध्यक्षीय मंडळ बैठकीत खेळाडूंच्या किताबांना मंजुरी मिळाली.

अमेय २१ वर्षांचा असून जीनो फार्मास्युटिकल्सचा सदिच्छा दूत आहे. अमेयने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात लाजवाब खेळ प्रदर्शित करताना नाव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयएम किताबासाठी आवश्यक तीन नॉर्म प्राप्त केले, तसेच २४०० एलो रेटिंगचाही टप्पा गाठला. अमेयने दिल्लीत झालेली जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा, त्यानंतर १८वी दिल्ली ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आणि रशियातील मॉस्कोत झालेल्या एरोफ्लॉट खुल्या ब बुद्धिबळ स्पर्धेत आयएम किताबाचे नॉर्म प्राप्त केले.

यावर्षी फेब्रुवारीत फिडेने अमेयच्या आयएम किताबावर शिक्कामोर्तब केले नव्हते. तांत्रिक कारणास्तव फिडेने हंगेरीतील टेन्केस कप स्पर्धेत अमेयने २०१७ साली विजेतेपदासह मिळविलेला आयएम किताब नॉर्म नामंजूर केला होता. त्यानंतर अमेयने जिद्द आणि निर्धाराने खेळत आयएम किताबासाठी आवश्यक तिन्ही नॉर्मची पूर्तता केली.

अमेयने २०१७ मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत जबरदस्त खेळ करताना २०२ एलो गुण नोंदवून २२०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे फिडेने त्याला फिडे किताब बहाल केला होता.

 गोव्याचे इंटरनॅशनल मास्टर

- अनुराग म्हामल २०१३ (ग्रँडमास्टर २०१७)

- रोहन आहुजा : २०१५

- लिऑन मेंडोसा : २०१९

- भक्ती कुलकर्णी : २०१९

- अमेय अवदी : २०२०

 

 

संबंधित बातम्या