आगामी क्रिकेट मोसमात अमितच्या जागी नव्या खेळाडूची शक्यता; तर एकनाथचा करार कायम

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 मे 2021

गतमोसमातील विजय हजारे करंडक(Vijay Hazare Trophy) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे(Goa Cricket) सर्वाधिक धावा करणारा मुंबईचा पाहुणा एकनाथ केरकर याचा करार कायम राहण्याचे संकेत आहेत,

पणजी: गतमोसमातील विजय हजारे करंडक(Vijay Hazare Trophy) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे(Goa Cricket) सर्वाधिक धावा करणारा मुंबईचा पाहुणा एकनाथ केरकर याचा करार कायम राहण्याचे संकेत आहेत, मात्र कर्नाटकच्या अमित वर्माच्या जागी नवा खेळाडू संघात येऊ शकतो. कोरोना विषाणू महामारीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा देशांतर्गत क्रिकेट मोसमाचा आराखडा अजूनही कच्चा आहे, मोसमाबाबत अजून स्पष्टता नाही. गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) काही दिवसानंतर कोविड-19 परिस्थितीनुरुप संघबांधणी प्रक्रिया हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खेळाडूंच्या फिटनेसवर जास्त भर असेल, असे सूत्राने नमूद केले.(Amit is likely to be replaced by a new player in the upcoming cricket season)

गोव्याचे सावियो मदेरा यांची अखिल भारतीय फुटबॉल तांत्रिक संचालकपदी नियुक्ती 

यष्टिरक्षक-फलंदाज असलेला मूळ गोमंतकीय एकनाथ 27 वर्षांचा आहे. मुंबईच्या रणजी संघात मातब्बर अनुभवी खेळाडू असल्यामुळे संधीअभावी राहिलेल्या या मेहनती क्रिकेटपटूने गतमोसमात गोव्यातर्फे खेळण्यासाठी पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने करार केला. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्याने पाच सामन्यांत 85च्या सरासरीने 340 धावा केल्या, त्यात हैदराबादविरुद्ध नोंदविलेल्या झंझावाती नाबाद 169 धावांचाही समावेश आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत एकनाथने ३१च्या सरासरीने 124 धावा केल्या. दोन्ही स्पर्धांत मिळून त्याने यष्टिमागे दहा सामन्यांत सहा झेल पकडले.
दुसरीकडे अमित वर्मा याच्या जागी नव्या दमाचा पाहुणा फलंदाज संघात आणण्याबाबत जीसीए विचार करत आहे. सध्या सारं काही प्राथमिक पातळीवर आहे. खेळाडू करारबद्ध करण्याची जीसीएला अजून घाई नाही, तरीही वय आणि गतमोसमातील कामगिरी यांचा विचार करता अमितला आणखी एका मोसमासाठी करार मिळणे अवघड आहे, असे सूत्राने सांगितले. अमित 33 वर्षांचा आहे.

AFC Champions League: एफसी गोवाची बचावपटू सॅनसनला पसंती 

अमितचे एकूण तीन मोसम
डावखुरा अमित वर्मा गोव्याकडून 2018-19 व 2019-20 असे दोन मोसम रणजी स्पर्धेत खेळला. दुसऱ्या मोसमात तो संघाचा कर्णधार होता. गतमोसमातील (2010-21) वन-डे आणि टी-20 स्पर्धेत त्याने गोव्याचे नेतृत्व केले. एकदिवसीय स्पर्धेत त्याला सूर गवसला नाही. फलंदाजी तो २०च्या सरासरीने 100 धावाच करू शकला, तसेच सहा गडी बाद केले. गोव्यातर्फे एकूण 19 रणजी सामन्यांत अमितने सहा शतकांच्या मदतीने 1397 धावा केल्या, तसेच लेगस्पिन गोलंदाजीत 56 गडी बाद केले आहेत. 
 

संबंधित बातम्या