अमित, स्मितला गोवा क्रिकेटची पुन्हा पसंती

dainik gomantak
गुरुवार, 14 मे 2020

प्राप्त माहितीनुसार, नव्या मोसमात गोव्याकडून एलिट गटात खेळण्यास अमित व स्मित इच्छुक आहेत.

पणजी,

 गतमोसमात गोव्याचे नेतृत्व केलेला अष्टपैलू अमित वर्मा आणि यष्टिरक्षक स्मित पटेल यांना गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) २०२०-२१ मोसमासाठीही `पाहुणा` क्रिकेटपटू या नात्याने करारबद्ध करण्याचे ठरविले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या दोघाही क्रिकेटपटूंच्या सहमतीने लवकरच करारपत्रावर सही अपेक्षित आहे.

``गतमोसमातील चांगल्या कामगिरीमुळे आम्ही अमित व स्मित यांचा करार वाढविण्याचे ठरविले आहे. आता त्यांच्या प्रतिसादानंतर करारावर शिक्कामोर्तब होईल. जर त्या दोघांनाही इतर राज्यांकडून चांगली ऑफर आली आणि त्यांनी दुसऱ्या संघाकडून खेळायचे ठरविल्यास आम्ही त्यांना रोखू शकणार नाही. अजून बराच वेळ बाकी आहे, त्यामुळे आताच त्यांच्या करारास आम्ही पुष्टी देऊ शकत नाही. एवढं निश्चित, की आमच्यासाठी सद्यःस्थितीत अमित व स्मित हेच नव्या मोसमातील पाहुणे खेळाडू आहेत,`` असे जीसीएकडून सांगण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, नव्या मोसमात गोव्याकडून एलिट गटात खेळण्यास अमित व स्मित इच्छुक आहेत. गतमोसमात गोव्याला प्लेट गटात अव्वल राखत एलिट गटात स्थान मिळवून देण्यात अमितसह स्मितने मोलाचे योगदान दिले होते.

गतमोसमातील रणजी क्रिकेट स्पर्धेत डावखुऱ्या अमितने १० सामन्यांत ४ शतके व ४ अर्धशतकांच्या मदतीने ६५.२३च्या सरासरीने ८४८ धावा केल्या होत्या. लेगस्पिन गोलंदाजीने प्रभाव पाडताना १५.७४च्या सरासरीने अमितने गोव्यातर्फे सर्वाधिक ४३ विकेट्स मिळविल्या होत्या. ४ वेळा त्याने डावात ५ गडी बाद करण्याची किमया साधली. स्मित सुद्धा गतमोसमात १० रणजी सामने खेळला. त्याने ६६.५८च्या सरासरीने ७९९ धावा केल्या. यामध्ये ३ शतके व ३ अर्धशतकांचाही समावेश होता. यष्टिरक्षक या नात्याने त्याने २० झेल आणि २ यष्टिचीत अशी कामगिरी केली.

अमितला विक्रमाची संधी

अमित गोव्यातर्फे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत २०१८-१९ व २०१९-२० असे दोन मोसम खेळला आहे. त्याने गोव्यातर्फे १९ सामन्यांत ६ शतके आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने १३९७ धावा केल्या आहेत, शिवाय ५ वेळा डावात ५ गडी बाद करण्याची किमया साधताना एकूण ५६ गडी बाद केले आहेत. गोव्यातर्फे पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने सर्वाधिक धावा करण्याची संधी अमितला आहे. त्यासाठी त्याला आणखी ७२ धावा कराव्या लागतील. गोव्याकडून २००२ ते २००७ या कालावधीत खेळताना मुंबईच्या मंदार फडकेने ५ शतकांच्या मदतीने १४६८ धावा नोंदविल्या.

संबंधित बातम्या