अमोघच्या तंदुरुस्तीचा गोव्याला दिलासा

किशोर पेटकर
शुक्रवार, 31 जुलै 2020

खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर अष्टपैलू पुन्हा मैदानावर येण्याच्या तयारीत

पणजी

सलामीचा फलंदाज, तसेच फिरकी आणि मध्यमगती मारा करू शकणारा उपयुक्त गोलंदाज अमोघ देसाई दुखापतीमुळे खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सावरत असून नव्या देशांतर्गत क्रिकेट मोसमापूर्वी गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाला दिलासा मिळाला आहे.

गतमोसमात (२०१९-२०) अमोघ देसाई फक्त विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळला, त्यानंतर बळावलेली उजव्या खांद्याची दुखापत, नंतर शस्त्रक्रिया यामुळे त्याला सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेस, तसेच रणजी करंडक स्पर्धेस पूर्णतः मुकावे लागले. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये बंगळूर येथे झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत खेळताना अमोघची दुखापत बळावली होती. हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याने ५५ धावांची खेळी केली, पण त्याच लढतीत त्याच्या खांद्याच्या दुखापतीने गंभीर रुप धारण केले.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्यानुसार, अमोघने आता खूपच प्रगती साधली असून तो तंदुरुस्ती-सामर्थ्याच्या बाबतीत सज्ज झाला आहे. जीसीएच्या साह्याने बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीद्वारेही त्याची शस्त्रक्रियेनंतरची पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे.

कोरोना विषाणू महामारीमुळे देशातील परिस्थिती पाहता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या देशांतर्गत क्रिकेट मोसमाबाबत स्पष्टता नाही. कदाचित पुढील वर्षीच्या प्रारंभी रणजी करंडक स्पर्धा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अमोघला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार हे नक्की.

अमोघ २७ वर्षांचा आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये पर्वरी येथे जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलेल्या अमोघला पहिल्याच डावात शतक १५ धावांनी हुकले होते. तेव्हापासून त्याने गोव्याचे ४५ सामने प्रतिनिधित्व करताना ६ शतकांसह २४९८ धावा केल्या असून गोलंदाजीत ३१ गडीही बाद केले आहेत. जानेवारी २०१९ मध्ये कटक येथे ओडिशाविरुद्ध तो शेवटचा रणजी सामना खेळला. २०१६-१७ मोसमात त्याचा फॉर्म कमालीचा ढेपाळला, पण नंतर त्याने सफल पुनरागमन केले. एकदिवसीय स्पर्धेत तो ४७ सामने खेळला असून २ शतकांसह ११६३ धावा केल्या आहेत. दोन मोसमापूर्वी त्याने एकदिवसीय स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व केले होते.

अमोघ देसाईची रणजी क्रिकेट कारकीर्द

मोसम सामने धावा शतके अर्धशतके बळी

२०१२-१३ ७ ३८५ १ २ ८

२०१३-१४ ८ ६२८ २ ३ ३

२०१४-१५ ८ ६३० १ ५ ३

२०१५-१६ ८ ३५९ १ १ २

२०१६-१७ २ २० ० ० ०

२०१७-१८ ५ २७८ १ १ ५

२०१८-१९ ७ १९८ ० ० १०

एकूण ४५ २४९८ ६ १२ ३१

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या