चेन्नईयीनच्या दोन गोलमुळे जमशेदपूरचा पडाव

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

अनिरुद्ध व इस्माईल गोन्साल्विस यांच्या प्रत्येकी एका गोलमुळे गतउपविजेत्यांना पूर्ण तीन गुण मिळाले. नेरियस व्हॅल्सकिस याने जमशेदपूरचा एकमात्र गोल केला.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीन एफसीने सातव्या मोसमातील मोहिमेची थाटात सुरवात केली. माजी प्रशिक्षक ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसीचा त्यांनी 2-1 फरकाने पाडाव केला. यंदाच्या स्पर्धेत गोल करणारा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक अनिरुद्ध थापा पहिला भारतीय ठरला.

वास्को येथील टिळक मैदानावर मंगळवारी झालेल्या लढतीतील तिन्ही गोल पूर्वार्धात 37 मिनिटांच्या खेळात झाले. जमशेदपूरने उत्तरार्धात बरोबरीसाठी खूप प्रयत्न केले, पण ते अपूर्ण ठरल्याने चेन्नईयीनचे हंगेरीयन प्रशिक्षक साबा लाझ्लो यांच्या आयएसएल मोहिमेची सुरवातही विजयाने झाली. अनिरुद्ध व इस्माईल गोन्साल्विस यांच्या प्रत्येकी एका गोलमुळे गतउपविजेत्यांना पूर्ण तीन गुण मिळाले. नेरियस व्हॅल्सकिस याने जमशेदपूरचा एकमात्र गोल केला.

यंदाच्या स्पर्धेतील सर्वांत वेगवान गोल नोंदविताना 22 वर्षीय अनिरुद्ध थापा याने पहिल्याच मिनिटास चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिली. आयएसएलच्या सातव्या मोसमात गोल नोंदविणारा पहिला भारतीय हा मान डेहराडूनच्या मध्यरक्षकास मिळाला. अनिरुद्धच्या उजव्या पायाचा सणसणीत फटका अचूक ठरला. तोच सामन्याचा मानकरी ठरला. 26व्या मिनिटास गिनी बिसाँचा आंतरराष्ट्रीय आघाडीपटू इस्माईल गोन्साल्विस (इस्मा) याने पेनल्टी फटक्यावर गतउपविजेत्यांची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. गतमोसमातील गोल्डन बूटचा मानकरी लिथुआनियाचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर नेरियस व्हॅल्सकिस याने जमशेदपूर संघाची पिछाडी 37व्या मिनिटास एका गोलने कमी केली.

सामना सुरू होऊन काही सेकंद झाले असताना चेन्नईयीनच्या खाती आघाडी जमा झाली. कर्णधार राफेल क्रिव्हेलारो याच्याकडून उजव्या बाजूने मिळालेल्या शानदार पासवर इस्मा याने जमशेदपूरच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली. गिनी बिसाँच्या खेळाडूने अनिरुद्धला गोल करण्याची दिलेली संधी प्राप्त करून दिली, ती भारतीय आंतरराष्ट्रीय मध्यरक्षकाने सुरेखपणे साधताना प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला हतबल ठरविले. 25 मिनिटांच्या खेळानंतर गोलक्षेत्रात जमशेदपूरच्या आयझॅक वनमलस्वॉमा याने चेन्नईयीनच्या लाल्लियानझुआला छांगटे याला मागून ओढले. यावेळी रेफरी संतोष कुमार यांनी पेनल्टी फटक्याची खूण केली. 29 वर्षीय इस्मा याने पेनल्टी फटका सत्कारणी लावताना जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला पूर्णतः चकविले.

नेरियस व्हॅल्सकिस याने विश्रांतीपूर्वी कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला थोडाफार दिलासा दिला. जॅकिचंद सिंगच्या भेदक क्रॉसपासवर व्हॅल्सकिसने अफलातून हेडिंग साधत प्रतिस्पर्धी गोलरक्षक विशाल कैथ याला बचाव भेदला. विश्रांतीनंतर जमशेदपूरला चेन्नईयीनच्या गोलरक्षकाच्या गोंधळामुळे बरोबरी साधण्याची संधी होती, पण ती बचावपटू एनेस सिपोविच याचा दक्षतेमुळे साधली गेली नाही. 68व्या मिनिटास गोलरक्षक विशाल कैथ पूर्णतः गोंधळला होता, या स्थितीत जमशेदपूरच्या जॅकिचंदने नेटच्या दिशेने फटका मारला, मात्र सावध असलेल्या सिपोविचने संघावरील संकट टाळले. इंज्युरी टाईममधील दुसऱ्या मिनिटास व्हॅल्सकिस चेंडू ताबा राखू न शकल्याने चेन्नईयीनची आघाडी अबाधित राहिली.

 

दृष्टिक्षेपात...

- 2016 पासून चेन्नईयीन एफसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिरुद्ध थापाचा 56व्या आयएसएल सामन्यात चौथा गोल

- आयएसएल स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या इस्मा याने गोल खाते उघडले

- गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत 15 गोल केलेल्या नेरियस व्हॅल्सकिस याचे आता एकूण 16  गोल

- चेन्नईयीनचा जमशेदपूरवर सलग दुसरा विजय, सहाव्या स्पर्धेत चेन्नई येथे 23 जानेवारी 2020 रोजी चेन्नई येथे 4-1 फरकाने विजयी

संबंधित बातम्या