डेव्हलपमेंट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी डेजी कार्दोझ यांची नियुक्ती

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

 एफसी गोवा व्यवस्थापनाने डेव्हलपमेंट संघाच्या मार्गदर्शकपदासाठी युवा चेहऱ्यास प्राधान्य देताना ३३ वर्षीय डेजी कार्दोझ यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

पणजी: एफसी गोवा व्यवस्थापनाने डेव्हलपमेंट संघाच्या मार्गदर्शकपदासाठी युवा चेहऱ्यास प्राधान्य देताना ३३ वर्षीय डेजी कार्दोझ यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळेल.

डेजी कार्दोझ यांनी यापूर्वी कोलकात्याच्या एटीके राखीव संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 साली एटीकेच्या राखीव संघाने कोलकात फुटबॉल लीगमध्ये द्वितीय विभागातून प्रथम विभागासाठी पात्रता मिळविली होती, तसेच 2018 साली सिक्कीम गोल्ड कप स्पर्धेची उपांत्य फेरीही गाठली होती. याशिवाय एटीके संघाने कोलकाता विभाग एलिट लीग स्पर्धेतही अव्वल क्रमांक मिळविला होता, तसेच डेजी यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 मधील ड्युरँड कप स्पर्धेतही भाग घेतला होता.

‘‘एफसी गोवा कुटुंबाचा सदस्य बनताना विश्वास बसणार नाही इतका उत्साहित झालो आहे. माझ्यासाठी ही विलक्षण संधी आहे,’’ असे डेजी यांनी एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर सांगितले. प्रशिक्षक या नात्याने जबाबदारी पेलताना मागील आठ वर्षे आपण गोव्यापासून दूर होतो. त्या अनुभवातून खूप काही शिकता आले. आता फुटबॉलमधील ज्ञान देण्यासाठी योग्य जागा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डेजी यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. क्लबतर्फे युवा विकासात दीर्घकालीन लक्ष्य गाठताना डेजी यांची सेवा खूप फायदेशीर ठरेल, असे मत एफसी गोवाचे तांत्रिक संचालक डेरिक परेरा यांनी प्रदर्शित केले.

आणखी वाचा:

नव्या मार्गदर्शनाखाली बंगळूरची कसोटी -

 

 

डेजी कार्दोझ यांच्याविषयी...

  • - 2010 साली फुटबॉल प्रशिक्षणातील कारकीर्द सुरू
  • - 2010-11 मध्ये राष्ट्रीय सबज्युनियर फुटबॉल स्पर्धेत गोव्याचे प्रशिक्षक
  • - 2011 पर्यंत दोन वर्षे कळंगुट असोसिएशनचे सहाय्यक प्रशिक्षक
  • - 2013 ते 2016 कालावधीत पुण्यातील डीएसके शिवाजीयन्स फुटबॉल क्लबचे सहाय्यक प्रशिक्षक
  • - 2016-17 मोसमात पुण्यात डीएसके शिवाजीयन्स-लिव्हरपूल इंटरनॅशनल अकादमीचे मुख्य प्रशिक्षक
  • - 2018 पासून कोलकात्यातील एटीके राखीव संघाचे प्रशिक्षक

 

संबंधित बातम्या