गोव्याचे सावियो मदेरा यांची अखिल भारतीय फुटबॉल तांत्रिक संचालकपदी नियुक्ती

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 मे 2021

गोव्याचे सावियो मदेरा यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) तांत्रिक संचालकपदी अंतरिम स्वरूपात नियुक्ती झाली आहे.

पणजी : गोव्याचे सावियो मदेरा (Savio Madeira) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) तांत्रिक संचालकपदी अंतरिम स्वरूपात नियुक्ती (All India Football Technical Director) झाली आहे.

एआयएफएफ (AIFF) तांत्रिक समितीची बैठक शुक्रवारी नवी दिल्ली येथे झाली. समितीचे प्रमुख श्याम थापा आजारी असल्याने ही ऑनलाईन बैठक उपप्रमुख हेन्री मिनेझिस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मदेरा यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली. ते रुमानियाचे आयझॅक दोरू यांची जागा घेतील. बैठकीस महासंघाचे सचिव कुशल दास, उपसचिव अभिषेक यादव यांनीही उपस्थिती लावली. (Appointment of Savio Madera of Goa as All India Football Technical Director)

गोव्याचे माजी फुटबॉल मध्यरक्षक सावियो मदेरा सध्या एआयएफएफ प्रशिक्षक शिक्षण विभागाचे प्रमुखपदी होते. गोव्यातील साळगावकर एफसीचे खेळाडू या नात्याने 17 वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या 56 वर्षीय मदेरा यांनी भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपदी भूषविले आहे. 2011 साली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने सॅफ कप विजेतेपद मिळविले होते. ते भारताकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलही खेळले आहेत.

AFC Champions League: एफसी गोवाची बचावपटू सॅनसनला पसंती

स्टिमॅक यांना मुदतवाढ

एआयएफएफ तांत्रिक समितीने राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना यावर्षी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. क्रोएशियाच्या माजी विश्वकरंडक खेळाडूच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी 15 मे रोजी संपला होता. विश्वकरंडक आणि आशिया करंडक स्पर्धा पात्रता फेरीतील बाकी तीन सामन्यांसाठी भारतीय संघ सध्या कतारमधील दोहा येथे सराव करत आहे. संघाचे सामने 3 ते 15 जून या कालावधीत अनुक्रमे कतार, बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध खेळले जातील.

 

संबंधित बातम्या