हैदराबादची नजर केरळाच्या कमजोर बचावावर

दैनिक गोमन्तक
शनिवार, 26 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात केरळा ब्लास्टर्सचा बचाव आतापर्यंत कमजोर ठरला असून त्याकडे हैदराबाद एफसीची नजर असेल.​

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात केरळा ब्लास्टर्सचा बचाव आतापर्यंत कमजोर ठरला असून त्याकडे हैदराबाद एफसीची नजर असेल. त्याचा लाभ उठविण्यासाठी ते रविवारी (ता. 27) प्रयत्नशील असतील.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. त्यावेळी अर्थातच दोन्ही संघ विजयासाठी इच्छुक असतील. केरळा ब्लास्टर्सला अजूनही स्पर्धेत विजय मिळालेला नाही. सहा लढतीत तीन बरोबरी आणि तेवढ्याच पराभवासह त्यांच्या खाती फक्त तीन गुण आहेत. हैदराबादने सहापैकी दोन सामने जिंकले आहेत. तीन बरोबरी व एका पराभवासह त्यांचे नऊ गुण आहेत. रविवारी पूर्ण तीन गुणांसह गुणतक्त्यात प्रगती साधण्याकडे हैदराबादचा कल असेल.

किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सने तब्बल 11 गोल स्वीकारले आहेत, त्यापैकी सहा गोल मागील यापूर्वीच्या तीन सामन्यातील आहेत. ईस्ट बंगालविरुद्धच्या अगोदरच्या लढतीत बदली खेळाडू जीक्सन सिंग याने इंज्युरी टाईममध्ये गोल नोंदविल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला बरोबरीची समाधान लाभले होते. केरळच्या आघाडीफळीस अजून सूर गवसलेला नाही.

हैदराबादच्या कामगिरीतही सातत्य नाही. ईस्ट बंगालला निसटते हरविल्यानंतर त्यांना मुंबई सिटीविरुद्ध स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेत चार गोल केलेल्या स्पॅनिश आरिदाने सांताना आणि बदली खेळाडू या नात्याने आक्रमणात लक्षवेधक ठरलेल्या लिस्टन कुलासो यांच्यावर हैदराबादची मदार राहील.

``प्रत्येक सामना कठीणच असतो. आम्हाला खडतर आव्हान अपेक्षित आहे. मागील लढतीत (मुंबईविरुद्ध) चांगला खेळ करूनही हैदराबादला पराभव पत्करावा लागला. आम्ही प्रगती साधत असून सकारात्मक पाऊल टाकत आहोत. चांगला सामना खेळण्याचा विश्वास वाटतो,`` असे व्हिकुना यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. केरळा ब्लास्टर्सचा आदर करताना मार्किझ यांनी सांगितले, की ``त्यांच्यापाशी चांगले खेळाडू आहेत. कदाचित ते जास्त गुणांसाठी पात्र होते. उद्याचा सामना समतोल असेल, काय होतंय ते पाहूया.``

 

दृष्टिक्षेपात...

  • - हैदराबाद व केरळा ब्लास्टर्सचे समान 6 गोल
  • - केरळा ब्लास्टर्सने 11 गोल स्वीकारेत, हैदराबादवर 6 गोल
  • - सलग 5 अपराजित लढतीनंतर हैदराबाद मागील लढतीत पराभूत
  • - हैदराबादच्या आरिदाने सांतानाचे 4 गोल
  • - गतमोसमात हैदराबाद येथे हैदराबादचा 2-1 असा, तर कोची येथे केरळा ब्लास्टर्सचा 5-1 असा विजय

संबंधित बातम्या