इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या नव्या मोसमाची सुरवात अर्सेनल एफसीने दणदणीतविजयी सलामी

वृत्तसेवा
रविवार, 13 सप्टेंबर 2020

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या नव्या मोसमाची सुरवात अर्सेनल एफसीने दणदणीत विजयासह केली. त्यांनी फुलहॅमवर ३-० फरकाने एकतर्फी विजय नोंदविला. ॲलेक्झांड्रे लाकाझेटे, संघातील नवा खेळाडू गॅब्रिएल व कर्णधार पिएरे-एमेरिक औबामेयांग यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

लंडन:  इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या नव्या मोसमाची सुरवात अर्सेनल एफसीने दणदणीत विजयासह केली. त्यांनी फुलहॅमवर ३-० फरकाने एकतर्फी विजय नोंदविला. ॲलेक्झांड्रे लाकाझेटे, संघातील नवा खेळाडू गॅब्रिएल व कर्णधार पिएरे-एमेरिक औबामेयांग यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

गनर्सकडून शनिवारी गॅब्रिएल व विलियन यांनी पदार्पण केले. सामन्याच्या आठव्याच मिनिटास लाकाझेटे याने फुलहॅमच्या गलथान बचावाचा लाभ उठवत संघाला आघाडी मिळवून दिली. २२ वर्षीय ब्राझीलियन गॅब्रिएलने ४९व्या मिनिटास अर्सेनलची आघाडी २-० अशी भक्कम केली. फ्रान्समधील लीग-१ मधील लिले संघाकडून खेळलेल्या गॅब्रिएलचा हेडर भेदक ठरला. कर्णधार पिएरे-एमेरिक याने ५७व्या मिनिटास शानदार फटक्यावर संघाला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. 

फुलहॅमची आजची कामगिरी पाहता, त्यांना प्रीमियर लीगमध्ये खडतर आव्हान पार करावे लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या बचावफळीतील उणीवा हेरत लाकाझेटे याने अगदी जवळून गोल केला होता. त्यानंतर विलियनच्या असिस्टवर गॅब्रिएलने गोल केल्यानंतर फुलहॅमचे खेळ खालावला. विलियनच्या आणखी एका असिस्टवर पिएरे-एरिक याने गोल केल्यानंतर फुलहॅमला संधीच लाभली नाही.प्रीमियर लीगमधील आणखी एका सामन्यात क्रिस्टल पॅलेसने साऊदॅम्प्टन संघावर १-० फरकाने मात केली. निर्णायक गोल १३व्या मिनिटास विल्फ्रेड झाहा याने नोंदविला.

संबंधित बातम्या